खासगी मेडिकल कॉलेजची फी 25 टक्क्यांपर्यंत वाढणार

मुंबई : रायगड माझा वृत्त 

महाराष्ट्रातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी 2019-20 शुल्कवाढ करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे पालकांच्या खिशाला चाप पडणार आहे. ही वाढ 25 टक्क्यांपर्यंत असल्याने वैद्यकीय शिक्षण महागण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचे शुल्क 9 लाख ते 12.5 लाखांच्या घरात जाण्याची चिन्हं आहेत.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई, नवी मुंबई, पुणे येथील अनेक खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना शुल्क नियंत्रण समिती (एफआरए)ने शुल्कवाढीची परवानगी दिली आहे. यातील मुंबईतील के. जे. सोमय्या आणि नवी मुंबई येथील तेरणा महाविद्यालय यांना अनुक्रमे 23 आणि 24 टक्क्यांपर्यंतची परवानगी मिळाली आहे. एफआरएचे सदस्य संजय पानसे यांच्या म्हणण्यानुसार, समितीने शुल्क रचना अधिक व्यवहार्य करण्यासाठी ही वाढ केली आहे. मात्र, सर्वच महाविद्यालयांमध्ये 25 टक्क्यांपर्यंत वाढ देण्यात आलेली नसून काही महाविद्यालयांना 10 टक्क्यांहून कमी वाढ देण्यात आली आहे, असं पानसे यांचं म्हणणं आहे. तर एफआरएचे अध्यक्ष एम. एन. गिलानी यांनी ही वाढ वाढत्या महागाईच्या अनुषंगाने केल्याचं म्हटलं आहे. वर्षानुवर्षं विद्यार्थी त्याच शुल्कात तेवढ्याच दर्जाचं शिक्षण घेत आहेत. हा खर्चंही महाविद्यालयांना परवडणं गरजेचं असल्याने ही वाढ आवश्यक असल्याचं गिलानी यांचं म्हणणं आहे.

दुसरीकडे या वाढीबद्दल पालकांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे. शुल्क नियंत्रणात आणण्याऐवजी एफआरएने शुल्क वाढीची घोषणा केल्याने आर्थिक ताण पडणार आहे. एकिकडे कर्नाटकसारखी राज्यं समान शुल्क आकारणी प्रक्रिया राबवत असताना तीच प्रक्रिया महाराष्ट्रात का राबवली जात नाही? असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत