खासदार अमोल कोल्हेंची आदित्य ठाकरेंवर टीका

पुणे : रायगड माझा वृत्त

‘विधानसभेपूर्वी यात्रा काढण्याऐवजी सत्तेत आल्यावर काढायला हवी होती. निमित्ताने कामे काय करायची हे समजले असते. मधल्या काळात यात्रा काढली असती तर कामाचे मुल्यांकन करता आले असते’. अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जन आशिर्वाद यात्रेवर टीकास्त्र सोडलं.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा पार पडली. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभानंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी आदित्य ठाकरे यांनी काढलेल्या जन आशीर्वाद यात्रेवर टीका केली. आदित्य ठाकरे यांनी ऐन विधानसभेच्या तोंडावर ही यात्रा काढली आहे. त्याऐवजी त्यांनी सत्तेत आल्यानंतर ही यात्रा काढली असती तर त्यांना काम कसं करावं हे समजलं असतं. मध्यंतरी काढली असती तर कामांचं मूल्यांकन करता आलं असतं, असा टोला त्यांनी लगावला.
आपल्या संस्कृतीत पिक तयार झाल्यावर कुणी दावा करायला आलं तर ते मान्य होत नाही, असाही टोमणा त्यांनी मारला. तसंच भाजपा सरकारकडून जनतेचा प्रचंड भ्रमनिरास झालाय. 2014 मध्ये कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र, असे विचारणाऱ्यांना आरशात उभे राहिल्यावर स्वतःलाच आपण कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र असे विचारण्याची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे जाण्याऐवजी पवारसाहेब, अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास असल्यामुळे कोणीही पक्षांतर करणार नसल्याचा विश्वासही अमोल कोल्हे यांनी यावेळी व्यक्त केला.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत