भांडुप : किशोर गावडे (प्रतिनिधी)
वीज बिलाची प्रतिमात्मक होळी करून शासनाचा जाहीर निषेध
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने वीज बिल कमी करण्याबाबतचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. मात्र, सत्ता आल्यानंतर त्याची पूर्तता केली नाही. उलट लाॅकडाऊन मधील वाढीव बिले आहेत, तशीच ठेवण्याचा निर्णय घेऊन सर्वसामान्य गोरगरीब विज ग्राहकांची महाआघाडीने फसवणूक केली आहे. असा घणाघाती आरोप ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांनी आज सोमवारी केला. यावेळी लाईट बिलाची प्रतिमात्मक होळी करून महाराष्ट्र सरकारचा निषेध व्यक्त केला गेला.
विक्रोळी विधानसभा व भांडुप विधान सभा भाजपच्या वतीने सोमवारी (दिं २३) महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कार्यालयावर महाराष्ट्र सरकारच्या विरोधात वाढीव बिल विरोधात धडक मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी खासदार मनोज कोटक मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी, सरकारच्या दुटप्पी निर्णयाचा भाजपच्या वतीने निषेध केला गेला.
माध्यमांशी बोलताना मनोज कोटक म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध केला होता. शिवसेनेने दहा वचने जनतेला दिली होती. त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे प्रामुख्याने वीजदरात कपात करून त्यामध्ये 300 युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी घरगुती वीजदर 30 टक्क्यांनी कमी करणार असे घोषित केले होते. मात्र, जवळपास एक वर्ष होऊन देखील या सरकारने कुठलीही वीजदर कपात अथवा वीजबिल माफी केली नाही. त्यामुळे भांडुप विधानसभा व विक्रोळी विधानसभेच्या भाजपच्यावतीने शिवसेनेच्या वचननामाचा जाहीर निषेध करत, यापुढे आंदोलन केले जाणार आहे. झोपेचं सोंग घेतलेल्या मुख्यमंत्र्यांना व ऊर्जामंत्री यांना जाग आणण्यासाठी ईश्वर नगरजवळील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कार्यालयावर प्रचंड जन आंदोलन केले गेले. व वाढिव विज बिलाची प्रतिमात्मक होळी करून शासनाचा निषेध केला गेला .
माझे लाईट बिल माझी जबाबदारी
माझे आरोग्य माझी जबाबदारी
माझे शिक्षण माझी जबाबदारी
मग महाआघाडीची जबाबदारी काय ? असा संतप्त सवाल खासदार मनोज कोटक यांनी केला आहे.
यावेळी, उत्तर भारतीय मोर्चा मुंबई अध्यक्ष जयप्रकाश सिंह, विक्रोळी विधानसभा अध्यक्ष व माजी नगरसेवक मंगेश पवार, भांडुप विधानसभा अध्यक्ष प्रवीण दहितूले, ईशान्य मुंबई जिल्हा सचिव दीपक दळवी, नगरसेविका साक्षी दळवी, भाजपाचे सर्व वार्ड अध्यक्ष व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनात सहभाग घेतला.