खुशखबरऽऽ मल्टिप्लेक्समध्ये महागडे पदार्थ घेण्याची गरज नाही, आता बाहेरचे नेता येणार; राज्य सरकारचा निर्णय

नागपूर :रायगड माझा 

मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा पाहायला जाणाऱ्या प्रेक्षकांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. तो म्हणजे मल्टिप्लेक्समध्ये आता बाहेरचे पदार्थ नेता येणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली. तसेच बाहेरून आणलेले पदार्थ आणल्यास अडविल्याचा प्रयत्न केल्यास, मल्टिप्लेक्समध्ये महागडे पदार्थ घेण्यास सक्ती करण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर कारवाई केली जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले आहे.

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून मल्टिप्लेक्स, महामार्गावरील फुडमॉल व मॉलमध्ये बाहेरील खाद्यपदार्थ खाण्यास घालण्यात येणारी बंदी आणि आतील खाद्यपदार्थांची जादा दराने होणारी विक्री याकडे सरकारचे लक्ष वेधले होते. त्यावर राज्यमंत्र्यांनी शुक्रवारी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. केंद्र सरकारने केलेल्या कायद्याप्रमाणे येत्या 1 ऑगस्टपासून एकाच वस्तूची किंमत सगळीकडे एक सारखीच असेल, असेही राज्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या किंमतीवरून मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले होते. त्यानंतर राज्य सरकारने या संदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.

पाच रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयांना..

पाच रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयांना का विकता, असा सवाल हायकोर्टाने केल्यानंतर मनसेने मल्टिप्लेक्सविरुद्ध राज्यभर आंदोलन सुरू केले होते. त्याविरुद्ध कोर्टाने दावा दाखल करून घेण्यास नकार दिल्याने अखेर मल्टिप्लेक्स चालकांना राजदरबारी धाव घ्यावी लागली होती. गेल्या आठवड्यात सर्व मल्टिप्लेक्स सीईओंनी राज यांची भेट घेतली. चहा-कॉफी, वडा, समोसा, पॉपकॉर्नचे दर 50 रुपयांपर्यंत कमी करावेत. चहा, कॉफी, पाणी बॉटल, समोसा, पॉपकॉर्न व वडा यांचे दर माफक असावेत. बाकीचे पदार्थ किती किमतीला विकावेत यावर आक्षेप नाही. लहान मुलांचे अन्न, मधुमेही व हृदयरोगींना बाहेरील अन्नपदार्थ आणण्याची परवानगी मिळावी, या मनसेच्या मागण्या मल्टिप्लेक्स व्यवस्थापनाने मान्य केल्या आहेत.

राज ठाकरे यांनी यावर घेतला होता आक्षेप
– चित्रपटगृहात खाद्यपदार्थांचे दर अवाजवी, प्रेक्षकांना विकत न घेतलेल्या पदार्थांचे बिल आकारण्याचे प्रकार घडतात.
– कर्मचारी वर्ग प्रेक्षकांशी उर्मटपणे वागतो अशा अनेक तक्रारीही आल्या.
– मध्यंतराचा कालावधी इतका छोटा असतो की झालेली फसवणूक प्रेक्षकाला चित्रपटगृह सोडल्यावर लक्षात येते. तक्रार करण्याचा मार्ग उपलब्ध नसतो.
– सिनेगृहात राष्ट्रगीतानंतर पडद्यावर यासंबंधीची तक्रार कुठे करावी याचा तपशील दाखवावा.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत