खोपोली राज्य महामार्गाचे काम संथ गतीने चालू ! कामाच्या दर्जाकडे एमएसआरडीसीचे दुर्लक्ष ?

राबगाव/पाली : विनोद भोईर
खोपोली या राज्यमार्गाचे  रुंदीकरणाचे काम मागील वर्षी हातात घेण्यात आले .या राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात वर्गीकरण करून रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले. हे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिपत्याखाली इपीसी कंत्राटदार मे. वराह इन्फ्रा लिमिटेडने जोमाने सुरू केल्यानंतर  येथील स्थानिक शेतकऱ्यांनी सर्वप्रथम या कामाला मोठ्याप्रमाणात विरोध केला.शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी पाली येथे 4 दिवसांचे उपोषण देखील केले. त्या उपोषणनातील मागण्यांचे पुढे काय झाले तसेच शेतकरी विरोध कुठे विरला हा एक प्रश्नच आहे. या कामाचे कंत्राट ज्या ठेकेदारकडे आहे त्याने मोठ्या घिसाड घाईने रस्याचे खोदकाम चालू केले. रस्ता टप्याटप्याने न करता सर्व रस्ता कुठे एकबाजूने तर कुठे दुसऱ्या बाजूने पूर्णपणे खोदून ठेवला. जानेवारी 2018 मध्ये काम करताना त्यांच्या अभियंत्यांना एवढे पण समजू नये की हा कोकणातील जास्त पाऊस पडणार भाग असून चार पाच महिन्यात पावसाळा येणार आहे त्यामुळे रस्ता खोदून ठेवल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे आणि तसे छोटे मोठे अपघात झाले देखील. जुलै महिन्यात तर खुरावले येथे रस्ताच पाण्यात वाहून गेल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली होती, सुदैवाने कोणतीही विपरीत घटना घडली नाही. नाहीतर बाजूलाच दुथडी भरून आंबा नदी वाहत होतीच. त्यावेळी मात्र ठेकेदाराने तत्परता दाखवून काम करून दिले. ती तत्परता  मात्र नंतर कधी दिसली नाही. रस्ता दोन्ही बाजूने उखडल्यामुळे वाहन चालकांना अतिशय अडचणींना सामोरे जावे लागत आहे . वाहनांचा दुरुस्तीचा खर्च वाढला असून कमरेचे आणि मानेचे  दुखणे  देखील नेहमी प्रवास करणार्या प्रवाश्यना उद्भवू लागल्या आहेत.
पाली खोपोली रस्त्याचे काम म्हणजे घिसाड घाई आणि नियोजन शून्यतेचा सुंदर मिलाफ असे समीकरणच झाले आहे. एका ठिकाणी काम करून मग नंतर पुढे जावे असे न करता एका ठिकाणी खोदकाम काही ठिकाणी मोऱ्यांचे काम तर काही ठिकाणी भराव आणि काही ठिकाणी काँक्रीटकरण होताना दिसत आहे त्यामुळे कोणत्याही कामाला कोणताच ताळमेळ सामान्य माणसाला दिसत नाही.
या रस्त्याच्या दर्जाबाबत  सामाजिक कार्यकर्ते संजय म्हात्रे म्हणाले की, या रस्त्याच्या  काँक्रीटकारनाला वापराच्या आधीच खड्डे पडले असून हा रस्ता पुढली 10 वर्ष सोडा उद्घाटनापर्यंत जरी टिकला तरी मोठी गोष्ट आहे. यावर बोलताना ते पुढे म्हणाले की, जुना रस्ता दुरुस्ती करण्यासाठी काही निधी तरतूद करण्यात आला होता का ? जर निधी असेल तर तो ह्या पावसाळ्यात कुठे खर्च केला याची सर्व सखोल माहिती ते माहितीच्या अधिकारात लवकरच घेणार आहेत जर दुरुस्ती साठी निधी वापरला असेल तर रस्ता कोठेच दुरुस्त झालेला दिसला नाही.
आपल्या कोकणातील मुंबई गोवा महामार्ग अशाच पद्धतीने गेली कित्येक वर्षे रखडलेला आपण याची देही याची डोळा बघत आलो आहोत. तीच अवस्था पाली खोपोली रस्त्याची न होवो हीच इच्छा येथील वाहन चालक आणि नागरिक करीत आहेत
‘ठेकेदारच्या निष्काळजीपणामुळे व  कोकणात होणाऱ्या  दुवाधार  पाउसामुळे पाली-खोपोली महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे . तरी ठेकेदारांनी तात्काळ या रस्त्याची डागडुजी करावी अन्यथा आम्ही मिनीडोर चालक-मालक संघटना लवकरात लवकर ठेकेदारा विरोधात आंदोलन छेडू ‘असे मंगेश भगत , अध्यक्ष – मिनीडोर चालक-मालक संघटना ,सुधागड-पाली यांनी म्हंटले .
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत