खोलीत दोन हाणा पण बाहेर साहेब म्हणा ! ही शिवसेनेची जुनी सवय !

मुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त 
महाविकास आघाडीसाठी शिवसेनेला घातलेल्या लेखी अटींबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावरून विरोधकांनी शिवसेनेला घेरलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता माजी खासदार नीलेश राणे यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. ‘खोलीत दोन हाणा, पण बाहेर साहेब म्हणा ही शिवसेनेची जुनी सवय आहे,’ अशी बोचरी टीका राणेंनी केली आहे.
महाआघाडीच्या सरकारचे काम राज्यघटनेच्या चौकटीतच होईल, असे शिवसेनेकडून लेखी घेतलं आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीच तसे आदेश दिले होते. तसे न झाल्यास सरकारमधून बाहेर पडण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यामुळं सत्तेसाठी हतबल होऊन शिवसेनेनं अटी स्वीकारल्याचं चित्र समोर आलं. शिवसेना नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी चव्हाणांचा हा दावा लगेचच फेटाळला. मात्र, विरोधकांनी ही संधी साधत शिवसेनेवर टीकास्त्र सोडलंय. शिवसेनेनं सत्तेसाठी नेमकं कोणतं डील केलं आहे हे एकदा जाहीर करावं, अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली होती.
त्यानंतर आज नीलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेला टोला हाणलाय. ‘हल्ली शिवसेनेला कोणीही टपली मारून जातं. शिवसेना लिहून चाटून सत्तेत आली आहे यात काहीच नवल नाही. ते जगजाहीर आहे. कारण, खोलीत दोन हाणा पण बाहेर साहेब म्हणा ही त्यांची जुनी सवय आहे,’ असं राणेंनी ट्विटमध्ये म्हटलंय. राणेंच्या या टीकेला शिवसेना उत्तर देणार की नेहमीप्रमाणे त्यांच्याकडं दुर्लक्ष करणार, याबद्दल उत्सुकता आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत