गणेशोत्सवात रेल्वेपेक्षा गावातूनच निघणाऱ्या एसटीला कोकणवासियांची पसंती

रायगड माझा वृत्त 

मुंबई:  गणपती उत्सवानिमित्त कोकणात गेलेल्या मुंबईच्या चाकरमान्यांना सुखरूप घरी आणण्यात एसटीने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली असून आज (19 सप्टेंबर रोजी) कोकणातून 1 हजार 78 जादा बसेस भाविक प्रवाशांना घेऊन मुंबईमध्ये दाखल झाल्या आहेत.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदा रेल्वेनेही जादा गाड्या सोडल्या होत्या. कोकणवासियांनी थेट आपल्या घरापासून उपलब्ध असलेल्या एसटीच्या वाहतुकीवर विश्वास दाखवत जादा बसेसना चांगला प्रतिसाद दिला. ही सर्व वाहतूक सुनियोजितरित्या आणि  निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी अहोरात्र राबणाऱ्या एसटीच्या सर्व कर्मचाऱ्यांचे राज्याचे परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आभार मानले आहेत

दिनांक 17 सप्टेंबरपासून कोकणातील चाकरमान्यांचा मुंबईच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू झाला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या विभागातून तब्बल 2 हजार 200 जादा एसटी बसेसचे आरक्षण नोंदणी झाले आहे. काल एका दिवसात तब्बल 1 हजार 78 जादा एसटी बसेस सुमारे 50 हजार पेक्षा अधिक गणेश भक्तांना घेऊन सुखरूपपणे मुंबईमध्ये दाखल झाल्या. कोकणातील दोडामार्ग ते बांद्यापासून  रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन पर्यंतच्या कोकणवासियांना एसटीने मुंबईत सुखरुप आणले. या सर्व बसेसची एकत्रित लांबी ही पनवेलपासून वडखळपर्यंत म्हणजे सुमारे 25 किलोमीटर इतकी झाली असती.

याबरोबरच दररोज कोकणातून सुटणाऱ्या 300 ते 350 नियमित बसेसचे आरक्षण देखील 23  तारखेपर्यंत आरक्षित झाले आहे. हा प्रतिसाद पाहता कोकणवासियांनी पुन्हा एकदा एसटीला अधिक पसंती दिल्याचे दिसून येते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत