गणेश विसर्जनावेळी राज्यात १६ जणांचा बुडून मृत्यू 

मुंबई: रायगड माझा वृत्त 

Image result for ganpati visarjan mrityu

रविवारी राज्यभर गणेश विसर्जनाचा जल्लोष सुरू असतानाच राज्याच्या काही भागात झालेल्या दुर्घटनांमुळे भक्तांच्या उत्साहावर विरजन पडले. रविवारी गणेश विसर्जनावेळी राज्यात झालेल्या विविध घटनांमध्ये १६ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यात जुन्नर आणि जालन्यातील प्रत्येकी तीन तरुणांचा समावेश आहे.

रविवारी मुंबईसह राज्यभरात गणेश विसर्जन थाटात पार पडले. मात्र विविध ठिकाणी झालेल्या दुर्घटनेत १६ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. मुंबईत भांडूपमध्ये जिग्नेश मयुरेकर या ३२ वर्षीय तरुणाचा विसर्जनावेळी भांडूपेश्वर कुंडात बुडून मृत्यू झाला. तर लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी गिरगाव चौपाटीवर मोठा अनर्थ टळला. विसर्जनाला जात असताना एक बोट बुडाली. मात्र सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी नाही झाली नाही. जीवरक्षकांनी या सर्वांना तात्काळ सुखरूप बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. या दुर्घटनेत जखमी झालेल्या महिलेसह एका मुलाला उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

जालना येथील मोती तलावात विसर्जनावेळी अमोल संतोष रणमुळे, निहाल खुशाल चौधरी (वय २६) आणि शेखर मधुकर भदनेकर (वय २०) या तीन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. मूर्ती पाण्यात जात असताना हे तिघेही मूर्तीच्या खाली दबले गेल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. नाशिकमध्येही चेतन बोराडे (२२, रा. चेतना नगर) या युवकाचा वालदेवी धरणात बुडून मृत्यू झाला. तर पुण्यातही देहुगाव इंद्राणी नदीपात्रात बुडून एका १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. त्याला तात्काळ पाण्याबाहेर काढून उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. जुन्नर तालुक्यात कावळ पिंपरी येथे गणपती विसर्जन करताना पाच मुलं बुडाली होती. त्यापैकी तिघांचा बुडून मृत्यू झाला असल्याचं सूत्रांनी सांगितलं. बुलडाण्यातील शेलगावमध्ये धरणात गणेश विसर्जनासाठी उतरलेल्या महादेव ताकतोडे आणि पुरुषोत्तम सोळाके या दोघांचा बुडून मृत्यू झाला असून इतर दोन जण जखमी झाले आहेत.

अहमदनगरमध्ये संगमनेर शहरात प्रवरा नदीत विसर्जनावेळी दोन तरुण वाहून गेले. त्यापैकी एकाला वाचवण्यात आले असून नीरव जाधव या तरुणाचा अद्याप शोध लागला नसल्याचं सागंण्यात आलं. अमरावतीच्या वरुड तालुक्यात खदानीत गणेश विसर्जनासाठी उतलेल्या राहुल नेरकर या तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. तर साताऱ्यातील माहुली गावाजवळील कृष्णा नदीच्या पात्रात बुडून दोघांचा मृत्यू झाल्याचं समजतं. सोलापूरातही एकाचा विसर्जनादरम्यान मृत्यू झाला आहे.

कुठे किती दगावले…

मुंबई- १
जालना- ३
नाशिक- १
पुणे- १
जुन्नर- ३
बुलडाणा- २
नगर- १
अमरावती- १
सातारा- २
सोलापूर-१

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत