गदिमा, बाबूजी, पुलं त्रयींचा जन्मशताब्दी महोत्सव

रत्नागिरी : रायगड माझा वृत्त 

गीतकार ग. दि. माडगूळकर, गायक, संगीतकार सुधीर फडके उर्फ बाबूजी आणि अष्टपैलू कलाकार पु. ल. देशपांडे ही महाराष्ट्राची साहित्य-संगीत-कलेची दैवतं. अशा या त्रयीचा जन्मशताब्दी महोत्सव उभा महाराष्ट्र साजरा करत आहे. या त्रिमूर्तीमधील समान धागा म्हणजे यांचे संगीतातील अमूल्य योगदान. हाच धागा पकडून अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने ‘त्रिवेणी’ या एका अप्रतिम मैफलीचे आयोजन केले आहे.

हा कार्यक्रम 11 नोव्हेंबरला सायंकाळी 5 वाजता जोशी पाळंद येथील चित्पावन मंडळाच्या ल. वि. केळकर विद्यार्थी वसतिगृह इमारतीतील श्री भगवान परशुराम सभागृहात होणार आहे. उदयोन्मुख हार्मोनियम वादक निरंजन गोडबोले यांच्या सप्तसुर मुझिकल्सची ही निर्मिती आहे. मैफल सर्व रसिकांसाठी विनाशुल्क आहे.

प्रसिद्ध अभिनेते विघ्नेश जोशी व निरंजन गोडबोले यांनी कार्यक्रमाची संकल्पना मांडली. या कार्यक्रमात रत्नागिरी, दापोली आणि चिपळूण येथील युवा गायक आणि वादक सादरीकरण करणार आहेत. यात गायक अजिंक्य पोंक्षे, अभिजित भट, हिमानी भागवत, अभय जोग आणि प्रियांका दाबके हे गायक कलाकार आहेत. हार्मोनियमसाथ निरंजन गोडबोले, कीबोर्ड चैतन्य पटवर्धन, व्हायोलिन उदय गोखले, तबला निखिल रानडे आणि तालवाद्य हरेश केळकर असे वादक कलाकार आहेत. दुग्धशर्करा योग असा की या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध अभिनेते, ऑर्गनवादक आणि अत्यंत ओघवती वाणी असलेले विघ्नेश जोशी करणार आहेत.

आपल्या असामान्य कलाकर्तृत्वाने या सरस्वतीपुत्रांनी आपल्याला भरभरून देणं दिले आहे. आधुनिक वाल्मिकी असे ज्यांना म्हटले जाते ते गीतरामायणासारखं अद्वितीय काव्य लिहिणारे गदिमा आणि त्या काव्याला तितक्याच समर्थपणे संगीताचा साज चढवणारे बाबूजी आपल्या कायमच संस्मरणीय आहेत. आपल्या अफाट लेखणीतून विविधांगी आणि बहुआयामी साहित्य निर्माण करणारे पु. ल. देशपांडे म्हणजे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटकच आहेत. अशा या संगीतमय त्रिवेणी संगमात न्हाऊन निघण्यासाठी रसिकांना आग्रहाचे आमंत्रण चित्पावन ब्राह्मण मंडळाच्या वतीने केले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत