गर्भवतीची गळफास घेऊन आत्महत्या, जीव दिल्यानंतर दिला बाळाला जन्म

जबलपूर : रायगड माझा ऑनलाईन 

Image result for suicide

गर्भवती महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मध्य प्रदेश येथील कटनी जिल्ह्यात घडली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गळफास लावल्यानंतर तिने बाळाला जन्म दिला आहे. देशाच्या वैद्यकीय इतिहासात अशा प्रकारची पहिलीच घटना असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

लक्ष्मी ठाकूर (36) असं या महिलेचं नाव आहे. कटनी जिल्ह्यात लक्ष्मी आपला पती संतोष आणि चार मुलांसह राहत होती. नऊ महिन्यांची गर्भवती असलेल्या लक्ष्मीने गुरुवारी सकाळी घराजवळील गोठ्यात गळफास लावून आत्महत्या केली. काही वेळाने तिच्या नवऱ्याने तिचा मृतदेह गोठ्यात लटकलेल्या अवस्थेत पाहिला आणि त्याने पोलिसांना पाचारण केलं. त्यावेळी लक्ष्मीने बाळाला जन्म दिल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. तिची प्रसूती झाल्याने बाळ नाळेसकट तिच्या साडीतच अडकलं होतं. पोलिसांनी बाळाची सुटका करत नाळ वेगळी केली आणि त्याला साफ करून त्वरित रुग्णालयात दाखल केलं.

रुग्णालयात अर्भक अतिदक्षता विभागात बाळावर उपचार सुरू असून त्याचा जीव वाचण्याची दाट शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे लक्ष्मीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून तिने आत्महत्या का केली, याचा शोध घेण्यात येत आहे. कारण, बुधवारी रात्रीपर्यंत लक्ष्मीसोबत कोणताही वाद अगर भांडण झालं नसल्याचं तिचा पती संतोष याचं म्हणणं आहे.

वैद्यकीय तज्ज्ञ मात्र या प्रकारावर आश्चर्य व्यक्त करत आहेत. कारण, फास लागल्यामुळे तिची प्रसूती झाल्याचं निदान वैद्यकीय तज्ज्ञांनी केलं आहे. पण, लक्ष्मीचा मृत्यू आणि तिची प्रसूती यांची नेमकी वेळ कळणं कठीण आहे. बाळाचा जन्म मृत्युपूर्वीच झाला असावा, कारण मृतदेहाची नैसर्गिक प्रसूती शक्य नसल्याचंही वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पण, तरीही जर लक्ष्मीच्या मृत्युनंतर तिची प्रसूती झाली असेल तर मात्र हा निसर्गाचा चमत्कार मानावा लागेल, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत