गुगलवर ‘बेस्ट टॉयलेट पेपर इन वर्ल्ड’ असं सर्च केल्यानंतर दिसतो पाकिस्तानचा ध्वज

मुंबई : रायगड माझा वृत्त 

पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले. त्याच्या निषेधार्थ एकीकडे देश पेटून उठला आहे. ‘अब तांडव होगा’ची भावना चहाच्या कट्ट्यापासून तर सोशल मीडियावर व्यक्त करण्यात येत आहे. पाकिस्तानच्या निषेधार्थ काही ‘कोडिंग एक्स्पर्ट्स’नी गूगल इमेज सर्चवर ‘बेस्ट टॉयलेट पेपर इन वर्ल्ड’ सर्च करताच पाकिस्तानी ध्वज दिसेल अशी ‘इंडेक्सिंग’ करून ठेवली आहे. सोशल मीडियाच्या स्टेटसवर या सर्चिंगचे स्क्रीन शॉट्सही झळकत आहेत. तर अनेकांनी हे सर्च स्क्रीन शॉट स्टोरी म्हणून इन्स्ट्राग्रामवर शेअर केले आहे.


यापूर्वीही अनेकवेळा गूगल बॉम्बिंग देशातच नव्हे तर जगभरात वापरण्यात आले आहे. यात २०१४च्या निवडणुकीदरम्यान राजकीय पक्षांकडून विरोधकांची थट्टा करण्यासाठी हा प्रकार वापरण्यात आला होता. याअंतर्गत गूगलवर ‘पप्पू’ म्हणून सर्च केल्यावर काँग्रेसअध्यक्ष राहुल गांधी यांचे छायाचित्र झळकत होते. तर ‘फेकू’ म्हणून सर्च केल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र झळकते. शिवाय, अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीदरम्यान ‘इडियट’ म्हणून सर्च केल्यावर सध्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे छायाचित्र झळकत होते.

गूगल बॉम्बिंग-वॉशिंग म्हणजे?
गूगलवर दररोज हजारो पानांची ‘इंडेक्सिंग’ केली जाते. याद्वारे गूगलवर युजरने काही सर्च केल्यास त्या सर्चच्या ‘की-वर्ड’ असलेले निकाल युजरच्या स्क्रीनवर झळकतात. ही संपूर्ण प्रक्रिया गूगलच्या पेज रँक अल्गोरिदमद्वारे पार पडते. या अल्गोरिदममध्ये एखादी व्यक्ती किंवा संस्थेने काही की-वर्ड सेट करून एखादे विशिष्ट छायाचित्र सेट केल्यास जे सर्च नंतर झळकते, त्यालाच ‘गूगल बॉम्बिंग’ किंवा ‘गूगल वॉशिंग’ असे म्हणतात. ‘बेस्ट टॉयलेट पेपर इन वर्ल्ड’ या की-वर्डसोबत पाकिस्तानचा ध्वज वापरण्यात आला आहे. या की-वर्डसोबत वारंवार पाकिस्तानच्या ध्वजाचा उपयोग करण्यात आला असल्याने गूगलचे ऑटो अल्गोरिदम सेट झाले. त्यामुळेच ‘बेस्ट टॉयलेट पेपर इन वर्ल्ड’ असे सर्च केल्यावर पाकिस्तानचे ध्वज झळकत असल्याचे मत सायबरतज्ज्ञांनी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केले.

गूगल कर्मचाऱ्यांसाठीही अशक्य!
की-वर्डमध्ये गूगल स्वत: फेरफार करीत असल्याचे आरोप अमेरिकेतील निवडणुकीच्यावेळी झाले होते. यावेळी गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले होते. यावेळी त्यांनी ‘गूगल सर्चचा निकाल हा कोट्यवधी की-वर्डच्या रँकिंगच्या आधारे येतो’, असे सांगितले होते. तसेच की-वर्डमधील फेरफार गूगलच्या कर्मचाऱ्यांसाठीही शक्य नसल्याचे स्पष्ट केले होते.

नागरिकांचे ‘सोशल भांडण’
एकीकडे देशातील प्रत्येक नागरिक जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन भारतीय सेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभा असताना राजकीय पक्षांद्वारे संचालित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर द्वेश पसरविण्यात येत आहे. काही पोर्टल राहुल गांधी यांच्यावर सोशल हल्ला करत आहेत, तर काही पेजेसवरून पंतप्रधान आणि इतर सत्ताधाऱ्यांचे पूर्वीचे ‘बोलणे’ आणि सध्याचे ‘वागणे’ यावर सत्ताधाऱ्यांना ट्रोल करण्यात येत आहे. अशा प्रकारच्या पोस्टमुळे नागरिकांचे आपसांत सोशल भांडण लागले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत