गुजरातः ‘बुलेट ट्रेन’ विरोधात शेतकरी हायकोर्टात

अहमदाबाद :रायगड माझा वृत्त 

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी ‘बुलेट ट्रेन’ प्रकल्पाला महाराष्ट्रातून विरोध झालेला असतानाच आता मोदींचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गुजरातमधूनही विरोध होऊ लागला आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला विरोध दर्शवत गुजरातमधील जवळपास १ हजार शेतकऱ्यांनी याविरोधात गुजरात हायकोर्टात धाव घेतली आहे. बुलेट ट्रेनच्या प्रस्तावित मार्गावरील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेला विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पासाठी आमची जमीन देण्याची इच्छा नाही. बुलेट ट्रेनसाठीच्या भूसंपादनाला आमचा विरोध आहे, असं म्हणत या शेतकऱ्यांनी गुजरात हायकोर्टात स्वतंत्र प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. केंद्र सरकारच्या या महत्वाकांक्षी १.१० लाख कोटी रुपयांच्या योजनेमुळे अनेक शेतकरी प्रभावित झाले आहे. मुख्य न्यायाधीश आर. सुभाष रेड्डी आणि न्यायाधीश व्ही. एम. पांचोली यांच्या खंडपीठात जमीन अधिग्रहणास आव्हान देणाऱ्या ५ याचिकांवर सुनावणी सुरू आहे.

बुलेट ट्रेनसाठी सप्टेंबर २०१५ मध्ये भारत आणि जापानदरम्यान करार झाल्यानंतर भूसंपादन कायदा २०१३ कमकुवत करण्यात आला, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच या प्रकल्पासाठी सुरू असलेली भूसंपादन प्रक्रिया भारत सरकारला स्वस्त दरात कर्ज देणाऱ्या जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीच्या (जेआईसीए) दिशानिर्देशांच्याही विरुद्ध असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे.

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन’च्या प्रकल्पाचे भूमिपूजन वर्षभरापूर्वी करण्यात आले आहे. मुंबईतील लोकलसेवेची स्थिती सुधारण्याची गरज असताना पंतप्रधान मोदींनी बुलेट ट्रेनसाठी अट्टाहास सुरू केला आहे. जोपर्यंत स्थिती सुधारत नाही तोपर्यंत मुंबईत बुलेट ट्रेनची एक विटही रचू दिली जाणार नाही, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत