गुजरातमध्ये भाजपच्या २३ आमदारांचे बंडाचे निशाण

गुजरातमध्ये भाजपचे ३ आमदार राज्याच्या पक्षनेतृत्वावर नाराज …

आणखी २० आमदार नाराज असल्याचा दावा 

अहमदाबाद: रायगड माझा 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा ही जोडी ‘मिशन २०१९’च्या तयारीला लागली असतानाच त्यांचे होम ग्राऊंड असलेल्या गुजरात भाजपामध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र समोर आले आहे. गुजरातमध्ये भाजपचे ३ आमदार राज्याच्या पक्षनेतृत्वावर नाराज असून आणखी २० आमदार नाराज असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

गुजरात म्हणजे पंतप्रधान मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा बालेकिल्ला मानला जातो. सरकारविरोधी वातावरण असतानाही, गेल्या वर्षीच्या निवडणुकीत सलग सहाव्यांदा गुजरातमध्ये भाजपाचे कमळ उमलले. दोनच दिवसांपूर्वी अमित शहा यांनी गुजरातला भेट दिली होती. २०१९ च्या निवडणुकीबाबत त्यांनी स्थानिक पदाधिका-यांशी चर्चा केली होती. या दौ-यानंतर लगेचच भाजपा आमदारांच्या नाराजीचा सूर उमटला आहे. त्यामुळे मोदी-शहांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

गुजरातमधील सरकारी बाबूंच्या मुजोरीचा मुद्दा उचलत, भाजपाच्या तीन आमदारांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. त्यांचा रोख मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्याकडे असल्याचे राजकीय वतुर्ळात बोलले जात आहे. भाजपाच्या या ३ आमदारांनी अहमदाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजी जाहीर केली. वाघोडीया येथील आमदार मधू श्रीवास्तव, सावलीचे आमदार केतन इमानदार आणि मांजलपूर येथील आमदार योगेश पटेल हे तिघे राज्याच्या नेतृत्वावर नाराज असून यासंबंधी अहमदाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली नाराजी जाहीर केली.

आपले म्हणणे मांडण्यासाठी दिल्लीमध्ये पक्ष नेतृत्वाकडे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदारांचे हे पाऊल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्यासाठी मोठा धक्का तर मानला जात आहेच पण राज्याचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याविरोधातील हा बंडाचा पवित्रा असल्याचेही बोलले जात आहे.

राज्याच्या नेतृत्वाकडून दुर्लक्षित केले जाते, महत्त्व दिले जात नाही. अधिका-यांची भेट घेण्यासाठीही आम्हाला ताटकळत ठेवले जाते. जनतेशी निगडीत मुद्यांवरही सरकारी अधिकारी काही उत्तरे देत नाहीत, ही नाराजीची कारणे आहेत अशी माहिती या आमदारांनी पत्रकार परिषदेत दिली. आणखी २० आमदारांनाही याच अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे तेही नाराज आहेत असा दावा त्यांनी केला. विशेष म्हणजे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी हे परदेशात असताना या आमदारांनी बंडाचा पवित्रा दाखवल्यामुळे याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत