गॅस टाकीचा स्फोट होऊन फुगेवाला जागीच ठार

कोपरगाव : रायगड  माझा ऑनलाईन 

मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी अकरा साडे अकराच्या सुमारास एस जी विद्यालय परिसरात गॅस फुगे विकणारा फुगेवाला फुग्यात गॅस भरीत असताना गॅस टाकीचा स्फोट होऊन यात फुगेवाला जुबेर रशीद पठाण 45 हा जागीच ठार झाला. जुबेर याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.

मकर संक्रांतीचा सण असल्याने पतंग उडवणाऱ्या शौकिनांनी गॅसचे फुगे घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. शहरातील चौकाचौकात गॅस फुगे विक्रीचा धंदा जोरात सुरू होता मात्र ही घटना घडल्याने सामाजिक कार्यकर्ते राहुल सूर्यवंशी यांनी तातडीने ठिकठिकाणी जाऊन गॅस फुगे विक्री बंद केली. दरम्यान, नगरपालिकेच्या मार्केट विभागाच्या पथकाने या टाक्या कोपरगाव शहर पोलिसांच्या ताब्यात दिल्या. या प्रकरणी कोपरगाव पोलिसांनी बेकायदा गॅस टाक्या विकणार्‍यांना ताब्यात घेतले असून कारवाई सुरू केली आहे.

दुसर्‍या घटनेत अशाच प्रकारे गॅस टाकीचा स्फोट होऊन सहा जण जखमी झाल्याचे कळते. येथील डॉक्टर फडके यांच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून याबाबत जखमींनी मौन पाळले आहे. आपल्या हातावर मांजा बनवताना गरम चरस पडले असल्याचा बनाव त्यांनी केला असल्याची चर्चा सुरू आहे. या घटनेतील नेमके सत्य काय आहे आता हे पोलीस तपासानंतरच कळू शकेल. शहरांमध्ये पतंग शौकिनांची मोठी गर्दी गर्दी होती व ज्या ठिकाणी हा स्फोट झाला त्या ठिकाणी विद्यालय आहे मात्र विद्यार्थी शाळेमध्ये असल्याने मोठा अनर्थ टळला. अशाप्रकारे बेकायदा रस्त्यावर गॅसचे फुगे विकणाऱ्यांचे बाबत पोलीस व पालिकेला सजग राहून काळजी घेण्याची गरज आहे.

मयत जुबेर पठाण यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून तो सीजनल व्यवसाय करून आपल्या पत्नी व सहा मुलांची उपजीविका भागवत होता. दुर्दैवाने त्याच्यावर काळाने घात केल्याने या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत