गोदावरी एक्सप्रेस नाशिकपर्यंत सुरू करण्याची शिवसेनेची मागणी

मनमाड : रायगड माझा वृत्त 

रेल्वे प्रशासनातर्फे इगतपुरी येथे तांत्रिक कामासाठी दररोज मेगाब्लॉक घेण्यात येत असल्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसांत प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. विशेष म्हणजे, मेगाब्लॉकच्या कामासाठी अनेक एक्सप्रेस रद्द न करता सर्वसामान्यांच्या सोयीची मनमाड-कुर्ला गोदावरी एक्सप्रेस 3 नोव्हेंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी मंगळवारी सकाळी रेल्वे अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेस नाशिकपर्यंत सुरू करावी, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेतर्फे देण्यात आले.

मंगळवारी सकाळी मोठ्या संख्येने नियमित नाशिक येथे जाणाऱ्या चाकरमान्यांनी स्टेशनमास्तर कार्यालयात धाव घेऊन अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमाड केला. अधिकाऱ्यांना जाब विचारला. 21 ऑक्टोबरपासून मेगाब्लॉकच्या नावाखाली गोदावरी एक्सप्रेस रद्द करण्यात येत आहे. त्यामुळे नोकरदार, विद्यार्थी आणि नियमित चाकरमान्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. प्रवाशांना कसा त्रास होतो याची माहिती संतप्त प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिली. गोदावरी एक्सप्रेस किमान देवळाली किंवा इगतपुरीपर्यंत सोडावी अशी आग्रही मागणी केली. प्रवाशांच्या भावना वरिष्ठापर्यंत पोहचवू असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. गोदावरी एक्सप्रेस 3 नोव्हेंबरपर्यंत रद्द केल्याने प्रवाशांसह नोकरदार वर्गाचे हाल होत आहेत.

शिवसेनेचे निवेदन
गोदावरी एक्सप्रेसही मनमाड व परिसरातील नागरिकांची वाहिनी आहे, तर भुसावळ-मुंबई पॅसेंजर ही सर्वसामान्यांची गाडी आहे. 19 ऑक्टोबरपासून या दोन्ही गाडय़ा रद्द केल्याने चाकरमान्यांचे हाल होत आहेत. दिवाळी सण व सणाच्या सुट्ट्या लागत असल्याने आता रेल्वेला गर्दी होणार आहे. अशा वेळी जादा गाडय़ा सोडण्याऐवजी आहेत. त्या गाडय़ा रद्द करण्याचे रेल्वेचे धोरण अनाकलनीय आहे. यावर त्वरित निर्णय घेऊन गोदावरी एक्सप्रेस नाशिकपर्यंत मार्गस्थ करावी व भुसावळ-मुंबई पॅसेंजर पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे, विधानसभा संघटक संतोष जगताप, तालुका संघटक संजय कटारिया, शहर उपप्रमुख प्रवीण धाकराव, युवा सरचिटणीस स्वराज देशमुख, संघटक महेंद्र गरुड, नीलेश ताठे, तसेच सुभाष माळवतकर, सार्थक महाले, आनंद दरगुडे, सोहिल पटेल आदींनी रेल्वे प्रशासनाला दिले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत