गोरेगांवमधील बहुचर्चित सौदाबी विकासकावर मोफा अंतर्गत गुन्हा दाखल

गृहनिर्माणच्या बिल्डराकडून सदनिकाधारकांची फसवणूक

गोरेगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपींना अटक करण्याची मागणी

माणगाव :प्रवीण गोरेगांवकर

माणगांव तालुक्यातील गोरेगाव येथील सर्वे नं. 18/1 ब या जागेमध्ये बांधण्यात आलेल्या सौदाबी निवासी संकुलाच्या विकासकावर मोफा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्याने बिल्डर क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. महाड, माणगांव, पोलादपुर तालुक्यातील मोफा कायद्यांतर्गत दाखल झालेल्या पहिलाच गुन्हा असल्याने सदनिकाधारकांना फसवणाऱ्या बिल्डर्समध्ये दहशत पसरली आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोरेगांव येथील विकासक डॉ. अस्लम लोखंडे व भागीदारांनी गोरेगांवमध्ये सौदाबी अपार्टमेंट नावाचे निवासी संकुल बांधून त्यातील 16 सदनिकांची विक्री करण्यात केली होती.  तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे इमारतीतील सदनिका धारकांना बिल्डर अस्लम अहमद लोखंडे तसेच आसिफ अहमद लोखंडे, मन्सूर अहमद लोखंडे, शब्बीर अहमद लोखंडे सर्व रा. गोरेगाव या चार आरोपींनी सदर बिल्डिंग बांधकामाबाबत  जिल्हाधिकारी रायगड  व सहा संचालक नगर रचना यांच्या आवश्यक सर्व परवानग्या घेण्यात आल्या आहेत अशी खोटी माहिती देऊन बनावट दस्तऐवज तयार करून खरेदीखत करून दिले होते.

 सदनिकाधारकांनीमालकी हक्का संदर्भात सोसायटी स्थापन करण्याचे ठरविल्यानंतर आरोपींनी त्यास विरोध करीत सोसायटीच्या अध्यक्षा श्री. राणा यांच्यावर व सोसायटीवर विविध न्यायालयात खोटे गुन्हे दाखल केले होते. जिल्हाधिकारी, नगर रचना खाते व ग्रामपंचायत यांची कोणतीही पुर्वपरवानगी न घेता सदर इमारतीच्या टेरेसवर तीन अनधिकृत सदनिकांचे बांधकाम केले. हे बांधकाम पाडण्यासाठी सोसायटीने सर्वच यंत्रणांजवळ पाठपुरावा करूनदेखील सोसायटीच्या मागणीची दखल कोणीही घेत नव्हते. जिल्हाधिकाऱ्यांकडून 5374 चौ.फु. बांधकामाची परवानगी घेऊन प्रत्यभात मात्र 10920 चौ. फु. चे बांधकाम करण्यात आले आहे.  सदर मिळकत हि सदनिका धारकांना हस्तांतरीत करणे बाबत विकासक सहकार्य करीत नसल्याने अखेर सौदाबी सह. गृहनिर्माण सोसायटीच्या अध्यक्षा व फिर्यादी श्रीमती डॉ. राणा समीर अलसुलकर (४२) यांनी सक्षम अधिकाऱ्यांकडे सर्व सदनिकाधारकांच्या वतीने तक्रार दाखल केली. जिल्हाधिकाऱ्यांनी डिम कन्वेंन्स मान्य करीत सोसायटी नोंदणीस परवानगी दिली. रायगड जिल्हाधिकारी, राजिप मुख्य कार्य. अधिकारी यांनी सदर इमारतीचे टेरेसवर आरोपीनी  संगनमत करून अनाधिकृतपणे केलेले बांधकामकाढण्याबाबत आदेश देऊनदेखील त्यावर कोणतीही कारवाई आजतागायत केली गेली नाही. उलट फिर्यादी व साक्षीदार यांचेविरुद्ध अनेक न्यायालयात खोटे दावे, केसेस दाखल करून त्यांना मानसिक व आर्थिक त्रास देऊन त्याचे कुटुंबियांचे जीवितास धोका निर्माण केला. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात चौघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्यापही गोरेगाव पोलिसांनी एकाही आरोपीला अटक केली नाही.

याबाबत गोरेगाव   पोलीस ठाणे कॉ. गु. र. न. 43/2018  भा.द.वि.सं.कलम 420, 467,468, 471, 506, 34 महाराष्ट्र मालकी हक्काचे सदनिका बांधण्यास प्रोत्साहन, अधिनियम 1963 चे कलम 13, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस  निरीक्षक अनिल टोम्पे यांच्या मार्गदर्शनांखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर खोत  अधिक तपास  करीत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत