गोरेगांव येथील विष्णू तलावात बुडून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू

माणगांव : प्रवीण गोरेगांवकर

गोरेगांव येथील विष्णु तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 14 वर्षीय शालेय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे.  रविवार दि. 19 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 7.00 वाजताचे सुमारास घडलेल्या या घटनेची खबर मुलाचे वडील नितीन शंकर उचाटे (44) रा. टेकडीची आळी, गोरेगांव, ता. माणगांव यांनी गोरेगांव पोलिस ठाण्यात दिली.

घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, घटनेतील मयत मुलगा विनायक नितीन उचाटे (14) हा सकाळीच आपल्या मित्रांसोबत विष्णुतलावात पोहण्यासाठी गेला होता. रविवार असल्याने तलावातील हौदात पोहण्यासाठी खुप गर्दी होती. विनायकला पोहता येत नसल्याने त्याने आपल्या कंबरेला प्लास्टीकचा कॅन बांधला होता असे समजते.

पोहतांना हा बांधलेला  कॅन पाण्यात उडी मारल्यावर अचानक सुटल्याने विनायक पाण्यात बुडाला. गर्दी असल्याने विनायक बुडाल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. परंतू पोहून झाल्यानंतर सर्वजण बाहेर आल्यावर तलावाच्या काठावर कपडे व चप्पल दिसल्याने कोणीतरी बुडाला असल्याचे समजल्याने सर्वत्र शोधाशोध केली.

विनायक बुडाल्याचे लक्षात येताच गोरेगांवमधील सामाजिक कार्यकर्ते अनिल माने, चंदू होळकर, मयुर साठे, मिलींद जोशी, अनंत तावडे, बबन माने, भिकु होळकर व लुकेश दोशी यांनी तातडीने तलावत व हौदामध्ये शोध घेतला परंतू दुर्दैवाने कु. विनायक याचा मृतदेह त्यांच्या हाती लागला. स्व. विनायक हा आईवडीलांचा एकुलता एक मुलगा असल्याने गोरेगांव परिसरांत सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत