गोळीबार प्रकरणः आर्थिक वादातूनच काकाचा खून

रत्नागिरी : रायगड माझा वृत्त

आर्थिक व्यवहारातून आणि मारहाणीचा बदला घेण्यासाठी रविवारी रात्री चालत्या मोटारीमध्ये काकाच्या डोक्‍यात मागून गोळी झाडून खून केल्याप्रकरणी चुलत पुतण्याला अटक करण्यात आली. किरण मल्लिकार्जुन पंचकट्टी (रा. गुलबर्गा-कर्नाटक) असे संशयिताचे नाव आहे.

कर्नाटकातही त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात आणखी काहींचा समावेश असून, त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शहराजवळ एमआयडीसीतील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीसमोर रविवारी (ता. ६) रात्री हा प्रकार घडला होता. आनंद बलभीम क्षेत्री (वय ३५, रा. झाडगांव) हे व्याजाने पैसे द्यायचे. किरण सुमारे सहा ते आठ महिन्यांपूर्वी त्यांच्याकडे आला. काका आनंद क्षेत्री यांनी त्याला आसरा आणि कामही दिले. ग्राहकांकडून तो वसूलीचे काम करत होता. त्यानंतर आनंद क्षेत्री यांनी नवीन गाडी घेतली. त्यासाठी त्याने किरणकडून साडे तीन लाख रुपये उसने घेतले. या व्यवहारातून ४ जानेवारीला त्यांच्यात वाद झाला. त्यातून आनंदने किरणला बेदम चोप दिला. त्याचा राग मनात धरून काल किरणने डाव साधला. काकाचे रिव्हॉल्व्हर कुठे असते याची त्याला माहिती होती.

काल रात्री मित्रांसह त्यांनी मद्यपान केले. किरण आणि आनंद कारमधून परतताना किरणने आनंदच्या डोक्‍यात मागून गोळी झाडली. यामुळे आनंदचे गाडीवरील नियंत्रण सुटून कार रस्ता सोडून कठड्यावर आदळली. मोठा आवाज झाल्याने सर्व गोळा झाले. तेव्हा अपघात झाल्याचे भासवत किरणनेच जखमी काकाला उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविले. गोळी लागून जखम झाल्याचा अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. त्यानंतर सीटी स्कॅनमध्ये डोक्‍यात गोळी आढळली. गाडीत किरण पंचकट्टी हा एकटाच असल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याने गोळी झाडल्याचे कबुल केले.

आनंद क्षेत्रीचा भाऊ दत्तात्रय बलभीम क्षेत्री यांनी याबाबत तक्रार दिल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करून किरण पंचकट्टी याला अटक केली. पोलिस अधीक्षक प्रवीण मुंडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, उपविभागिय पोलिस अधिकारी गणेश इंगळे याच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुरेश कदम, स्थानिक गुन्हे शाखेचे शिरीष सासने आदींनी २४ तासात संशयितास अटक केली. न्यायालयाने त्याला सात दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

मुद्रांक योजनेतही गैरव्यवहार
मुद्रांक योजनेअंतर्गत आनंद क्षेत्री याने चुलत पुतण्या किरण पंचकट्टी याला सुमारे ९ लाखांचे कर्ज काढून दिल्याचे समजते. त्या कर्जातील तीन लाख रुपये आनंदला गाडी घेण्यासाठी दिले होते. मात्र या मुद्रांक योजनेचा गैरवापर केल्याचा पोलिसांचा अंदजा आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत