गोव्याचे खातेवाटप दिल्लीतील हॉस्पीटलमध्ये ठरणार

पणजी : रायगड माझा वृत्त 

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल आहेत.  त्यांच्याकडे असलेली खाती कोणाकडे सोपवायची आणि मंत्रिमंडळातील मंत्र्यांकडे असलेल्या जबाबदाऱ्यांमध्ये काही बदल करायचा का याबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे. या विशेष बैठकीसाठी  सात मंत्री आज दिल्लीत दाखल झाले आहेत.

पितृपक्ष संपल्या नंतर मुख्यमंत्री आपल्या कडील अतिरिक्त खाती सहकारी मंत्र्यांना वाटतील असे ठरले होते.त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी उद्या सर्वाना थेट चर्चेसाठीच बोलावले आहे. भाजपाचे मंत्री माविन गुदिन्हो, निलेश काब्राल व विश्वजित राणे हे बैठकीत सहभागी होणार आहेत. नगर विकास मंत्री मिलिंद नाईक बैठकीस उपस्थित राहतील की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दिल्लीतील एम्स इस्पितळात मुख्यमंत्री उपचार घेत असून तिथेच बैठक होणार आहे. मुख्यमंत्री आपल्याकडील अर्थ व गृह खाती देणार नसल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे, मात्र इतर महत्त्वाची खाती ते उद्या सहकारी मंत्र्यांकडे सोपवून आपल्या वरील ताण कमी करून उपचारा नंतर विश्रांती घेतली अशी चर्चा आहे . वन, पर्यावरण, खाण, सहकार, शिक्षण, उच्च शिक्षण, तांत्रिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, नागरी उड्डाण अशी विविध खाती तसेच गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ, मोपा प्राधिकरण, कचरा व्यवस्थापन महामंडळ अशा सरकारी संस्थांची चेअरमनपदेही पर्रिकर यांच्याकडेच आहेत. खाते वाटप उद्याच होणार याबद्दल निश्चितपणे सांगितले जात नाही. मंत्र्यांचे म्हणणे ऐकून मुख्यमंत्री मग स्वतंत्रपणे भाजपशी चर्चा करतील. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनाही खात्यांची यादी दाखवली जाईल. त्यानंतर निर्णय होईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत