गौरी लंकेश हत्या प्रकरणी बेळगावमधील एका युवकाला अटक

बेळगाव : रायगड माझा वृत्त 

पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी बेळगावमधील एका युवकाला अटक करण्यात आली आहे. बेळगावातील महाद्वार रोड परिसरातील हा तरूण आहे. कर्नाटक एसआयटीकडून या युवकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. सध्या कर्नाटक एसआयटीकडून कसून चौकशी सुरू आहे. पण दरम्यान, कारवाईबाबत एसआयटीकडून कमालीची गुप्तता ठेवण्यात आली आहे. या सगळ्यातून आता लंकेश हत्या प्रकरणातलं बेळगाव कनेक्शन उघड झालं आहे.

गेल्या काही दिवसांआधीही कर्नाटक एसआयटीकडून एक गौरी लंकेश हत्या प्रकरणात एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे. सुरेश असं त्याचं नाव होतं. हल्ल्याचा संशय असलेल्या परशुराम वाघमारे आणि त्यांच्या सहकार्यांना त्याने भाड्याने घरं उपलब्ध करून दिलं होत असा पोलीसांचा आरोप होता. या प्रकरणाच्या तपासात पोलीसांनी धक्कादायक खुलासाही केला होती की, अटकेतील एका आरोपीकडे एक डायरी मिळाली होती. त्यात काही मान्यवरांची नावं होती. त्यात गिरीष कर्नाड क्रमांक एकवर होते तर गौरी लंकेश यांचं नाव दुसऱ्या क्रमांकावर होतं. ही यादी देवनागरीत लिहिली असून त्यात साहित्यिक बी.टी. ललिता नाईक, निदुम्मिदी मठाचे पुजारी वीरभद्र चन्नामलाल स्वामी आणि पुरोगमी कार्यकर्ते व्दारकनाथ यांच्या नावांचा समावेश होता.

हे सर्व मान्यवर डाव्या विचारांचे, पुरोगमी चळवळीचे असून कट्टरतावाद्यांवर त्यांनी सातत्याने टीका केली होती. या सर्व मान्यवरांना संपवण्याचा डाव होता अशी माहितीही पोलीसांनी दिली होती.

गौरी लंकेश हत्या प्रकरणात आत्तापर्यंत 12 जणांना पोलीसांनी अटक केलीय. पोलीस अजूनही या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यामुळे आता बेळगावातून अटक केलेल्या युवक काय माहिती देतो यावर तपासाची पुढची दिशा असणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.