गौरी लंकेश हत्येचे पिंपरी-चिंचवड “कनेक्‍शन’?

पिंपरी : रायगड माझा 

कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) तीन दिवसांपूर्वी म्हैसूरू येथील प्रा. के. एस. भगवान यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी चौघांना अटक केली होती. हे चौघेही एका संघटनेशी संबंधित असून त्यापैकी अमोल काळे उर्फ भाईसाहेब (वय-39) हा चिंचवड येथे राहणारा आहे. या चौघांचा कर्नाटकातील सामाजिक कार्यकर्त्या आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येशी संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे.

हिंदू जनजागृती समितीचा कार्यकर्ता अमोल काळे उर्फ भाईसाहेब (वय-39, महाराष्ट्र), सनातन संस्थेचा कार्यकर्ता अमित देगवेकर उर्फ प्रदीप (वय-39, गोवा) कर्नाटकातील विजयपूर येथील मनोहर इडवे (वय-28), हिंदू जनजागृती समिती आणि सनातन संस्थेचा कार्यकर्ता सुजीत कुमार उर्फ प्रवीण (वय-37, मंगळुरू) या चौघांना प्रा. भगवान यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

दि. 5 सप्टेंबर 2017 मध्ये गौरी लंकेश यांची त्यांच्या पश्‍चिम बंगळुरूतील घराबाहेर अज्ञात व्यक्तींनी हत्या केली होती. हे चारही संशयित हे सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीशी संबंधित आहेत, असे सांगण्यात येत आहे. या सर्वांचे के. टी. नवीन कुमार (वय-37) या हिंदू युवा सेनेच्या कार्यकर्त्याशी संबंध असल्याचा संशय एसआयटीला आहे. या सर्वांच्या पूर्वी अनेकवेळा बैठका झालेल्या आहेत. नवीन कुमारला गौरी लंकेश हत्येप्रकरणी मार्च 2018 मध्ये अटक करण्यात आली आहे. दरम्यान, स्थानिक पोलिसांना या अटकेबद्दल काहीही माहिती नाही. दरम्यान, या प्रकरणी अमोल काळे याना कर्नाटकातूनच अटक करण्यात आली आहे. या कारवाईत स्थानिक पोलिसांचा संबंध नसल्याचे पोलीस उपायुक्‍त गणेश शिंदे यांनी म्हटले आहे.

कोण आहे अमोल काळे?
अमोल काळे हे गेल्या दहा ते बारा वर्षांपासून चिंचवड येथील माणिक कॉलनीमध्ये अक्षय प्लाझा येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे कुटुंब एका हिंदुत्वादी संघटनेशी संबंधित असल्याचे समजते. त्याच्या वडिलांचा पानाचा व्यवसाय आहे. आठ दिवसांपूर्वी कर्नाटक पोलिसांचे एक पथक काळे यांच्या घरी आले होते. या पथकाने तब्बल सात ते आठ तास अमोलच्या घराची झडती घेतली. त्यानंतर 31 मे रोजी अमोल याला गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यापूर्वी कर्नाटकातील उप्परपेट जिल्ह्यातील पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात त्यांना अटक केली होती. त्यानंतर लंकेश यांच्या हत्या प्रकरणी अमोलला एसआयटीच्या ताब्यात देण्यात आले. अमोल हा कोणत्याही संघटनेत, संघटनेच्या कार्यक्रमात सहभागी नसून भूमिगत राहून कार्य करत असल्याचा पोलिसांना संशय आहे.

22 फोन, 74 सिमकार्ड, 12 जणांची यादी
कर्नाटक पोलिसांनी केलेल्या चौकशीत अमोल काळे यांच्याकडे 74 सिमकार्ड आणि 22 मोबाइल फोन आढळून आलेले आहेत. यापैकी बरीचशी सिमकार्ड त्याने पुण्यातून खरेदी केलेली असून अन्य महाराष्ट्राच्या इतर शहरामधून आणि बेळगावमधून घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्याचप्रमाणे त्याच्याकडे सापडलेल्या डायरीमध्ये एक चिट्ठी आढळून आली असून त्यामध्ये 12 वेगवेगळ्या व्यक्तीची नावे लिहिलेली आहेत. त्यामध्ये गौरी लंकेश यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे समोर आले आहे. त्याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता काळे यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत