ग्रामपंचायत निवडणुकीत कर्जत तालुक्यात शिवसेनेची पीछेहाट, १३ पैकी ७ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीची सत्ता

कर्जत : कांता हाबळे | अजय गायकवाड 

विधानसभेची  रंगीत तालीम म्हणून पाहिल्या गेलेल्या कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेची पीछेहाट झाली असून राष्ट्रवादीला देखील मतदारांनी सूचक इशारा दिला आहे. या निकालात राष्ट्रवादीचे सर्वाधिक सरपंच निवडून आले आहेत. 

कर्जत तालुक्यात तेरा ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरु होती. तेरापैकी कशेळे  ग्रामपंचायतीमध्ये  सरपंच आणि सदस्यांची बिनविरोध निवड झाली. याबरोबर बीड बुद्रुक सरपंच देखील बिनविरोध निवडण्यात आला. उर्वरित अकरा ग्रामपंचायतीमध्ये मात्र चुरशीची लढत पहायला मिळाली.

प्रतिष्ठेच्या मानिवली ग्रामपंचायतीमध्ये शेकापचे तालुका चिटणीस आणि हुतात्मा हिराजी पाटील ग्राम विकास आघाडीचे उमेदवार प्रवीण पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रीतम डायरे यांचा ४०० मतांनी पराभव केला. शेलू मध्येही काँग्रेस आणि राष्ट्रवादी परस्परांना भिडले. या ग्रामपंचायती मध्ये काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष शिवाजी खारीक यांनी रवी मसणे यांचा दणदणीत पराभव केला. यावेळी आसल ग्रामपंचायत राष्ट्रवादीने सेनेकडून हिसकावून घेतली. वारे या ग्रामपंचायतीच्या निकालाकडेही सर्वांचे लक्ष होते. इथे शेकापचे नेते राम राणे यांचे सुपुत्र  योगेश राणे यांनी दणदणीत विजय मिळविला. जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर झालेली  त्यांच्या  ग्रामपंचायतीची  निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. या ग्रामपंचातीमध्ये अवघ्या १५ मतांनी शिवसेनेच्या कल्याणी कराळे या विजयी झाल्या. त्यांना १०४९ मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी अश्विनी कराळे यांना १०३४ मते मिळाली.

मानिवली ग्रामपंचायतीमध्ये शेकापचे तालुका चिटणीस आणि हुतात्मा हिराजी पाटील ग्राम विकास आघाडीचे उमेदवार प्रवीण पाटील विजयी.

 

तेरा पैकी  सात ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे सरपंच निवडणून आले आहेत यापैकी दोन जणांची बिनविरोध  निवड झाली आहे. शिवसेनेचे दोन सरपंच विजयी झाले आहेत तर काँग्रेसचा एक सरपंच विजयी झाला आहे. देशात राज्यात सत्ता असलेल्या भाजपाची मात्र पाटी कोरी राहिली आहे.

या निवडणुकीच्या निकालासाठी कर्जत तहसील कार्यालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. पोलीस बंदोबस्त देखील तैनात होता. मात्र तरीही शेलू ग्रामपंचायतीच्या निकालानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते परस्परांना भिडले. यामुळे काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता . पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केल्याने हा तणाव आटोक्यात आला.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी पारंपरिक युती आघाडी सोडून पक्ष एकत्र आल्याचेही दिसून आले. मानवलीमध्ये शिवसेना -राष्ट्रवादी एकत्र होती तर शेकाप काँग्रेस यांची इथे आघाडी होती. कमी अधिक प्रमाणात असेच चित्र सर्वच ठिकाणी पाहावयास मिळाले . ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीत शिवसेनेची पीछेहाट झाली असली तरी राष्ट्रवादीला देखील सूचक इशारा असल्याचे बोलले जात आहे. 

राष्ट्रवादी : ७ | शिवसेना : २ | शेकाप : २ | कॉंग्रेस : १ 

कर्जत तालुक्यातील थेट सरपंच पदाचे विजयी उमेदवार

 • मानिवली -प्रवीण पाटील – शेकाप
 • वारे- योगेश राणे – शेकाप
 • माणगाव तर्फे वरेडी -कल्याणी कराळे – शिवसेना
 • पाषाने – गोटीराम वाघ – शिवसेना
 • शेलू- शिवाजी खारीक – काँग्रेस
 • बोरिवली- वृषाली क्षीरसागर – राष्ट्रवादी काँग्रेस
 • मोग्रज – रेखा देशमुख – राष्ट्रवादी काँग्रेस
 • आसल-रमेश लदगे – राष्ट्रवादी काँग्रेस
 • पिंपलोळी- चंद्रकांत निरगुडा – राष्ट्रवादी काँग्रेस
 • सावळा-हेदवली- सुनंदा गायकर – राष्ट्रवादी काँग्रेस
 • कशेळे- हर्षला राणे – बिनविरोध – राष्ट्रवादी काँग्रेस
 • बीड बुद्रुक – प्रभावती लोभी – बिनविरोध-राष्ट्रवादी काँग्रेस

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत