ग्रुपमध्ये प्रवास करणाऱ्यांची अरेरावी सुरूच; रुमाल टाकून अडवतात जागा

विरार : रायगड माझा वृत्त 

पश्चिम रेल्वेच्या विरार स्थानकात लोकलमध्ये जागा पकडण्यासाठी ग्रुपमध्ये प्रवास करणाऱ्यांची अरेरावी दिवसेंदिवस वाढतच आहे. विरारहून चर्चगेटच्या दिशेने पहाटे सुटणाऱ्या लोकल ट्रेन मध्ये काही प्रवासी आपल्या सहकाऱ्यांसाठी चक्क सिटवर रुमाल, बॅग, किंवा पाण्याच्या बाटल्या ठेऊन जागा अडवून बसतात. त्यामुळे सकाळ-सकाळी सामान्य प्रवासी आणि ग्रुपवाले प्रवासी यांच्यात सिटवरून वाद वाढत आहेत.

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये जागेवरून वाद होताना आपल्याला नेहमी बघायला मिळतात. मात्र विरारमध्ये सध्या जागा मिळवण्यासाठी रुमाल गँगची दहशत बघायला मिळत आहे. सकाळच्या सुमारास आपल्या मित्रांसाठी सिटवर रूमाल टाकून जागा अडवण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे काहीजण तर सिट नालासोपाऱ्याहूनच अडवून आलेले असतात, तर काही वेळा नालासोपाऱ्यात चढणाऱ्या सहकाऱ्यासाठी विरारहून सिटवर रूमाल ठेऊन जागा अडवलेली असते. त्यामुळे विरार स्थानकात गाडीमध्ये चढून देखील ग्रुपवाल्या प्रवाशांच्या मुजोरीमुळे बसण्यासाठी जागा असूनही सामान्य प्रवाशांना ताटकळत उभे रहावे लागत आहे.

या प्रकाराबाबत विरार स्थानकातील रेल्वे पोलीस किंवा स्टेशन मास्तरांकडे तक्रार करूनही काहीच कारवाई केली जात नसल्याचे प्रवासी सांगतात. तर कारवाई होत नसल्यामुळे  ग्रुपवाल्या प्रवाशांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत आहे. यावर लवकरात लवकर आवर घालावा अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत