घरकुल घोटाळ्यात काँग्रेसच्या माजी मंत्र्याला अटक

रायगड माझा वृत्त 

खान्देशातील जळगाव घरकुल घोटाळानंतर आता धुळे जिल्ह्याच्या दोंडाईचा घरकुल घोटाळ्याने एका माजी मंत्र्याच्या गळ्याभोवती फास आवळला आहे. दोंडाईचा येथील घरकुलात गैरव्यवहार केल्याप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी कामगार मंत्री डॉक्टर हेमंत देशमुख यांना अटक करण्यात आली आहे.

धुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने त्यांना जिल्हा न्यायालयात ताब्यात घेऊन अटक केली आहे. डॉक्टर देशमुख सध्या अंतरिम जामीनावर होते. मात्र हा जामीन रद्द झाल्यामुळे त्यांना न्यायालयाच्या आवारातच ताब्यात घेण्यात आले. जिल्हा न्यायालयाने डॉ. देशमुख यांना तात्पुरता जामीन दिला होता, तो रद्द करण्यासाठी जिल्हा न्यायालयात कामकाज सुरू होते. त्यानंतर डॉक्टर देशमुख कारवाई पुढे ढकलण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या करत होते. मात्र अखेर याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान जळगाव घरकुल घोटाळयाप्रमाणेच राजकीय दबावाला बळी न पडता माजी मंत्री डॉक्टर हेमंत देशमुख यांच्यावरती खटला चालवण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 2016 साली या गैरव्यवहार प्रकरणी दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी दलित आदिवासी मातंग समाज मंडळाचे अध्यक्ष कृष्णा नगराळे यांनी औरंगाबाद खंडपीठात केलेल्या याचिकेनुसार माजी मंत्री हेमंत देशमुख यांच्यासह तत्कालीन तीन माजी नगराध्यक्ष, आणि तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात आता माजी मंत्री हेमंत देशमुख यांना अटक झाली असून 3 नगराध्यक्ष , 3 मुख्याधिकारी, ठेकेदार हे तात्पुरता जामीनावर सुटले आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत