घरगुती कोचिंग क्‍लासेसवर कारवाई नाही

खासगी क्‍लासेससाठी कायदा आणणार

नागपूर: रायगड माझा 

खासगी कोचिंग क्‍लासेसच्या नावाखाली राज्यात शिक्षणाचा बाजार मांडला गेला असतानाच घरामध्ये विद्यार्थ्यांची शिकवणी घेणाऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकार खासगी कोचिंग क्‍लासवर नियंत्रण आणण्यासाठी कायदा करीत असला तरी 25 ते 50 मुलांना ट्यूशन देऊन रोजगार मिळवणाऱ्या गृहिणी तसेच तरुणांना या कायद्यातून वगळण्यात येणार आहे, असा निर्वाळा देतानाच अशा ट्यूशनवर कारवाई करण्यात येणार नसल्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज स्पष्ट केले.

राज्यभरात कोचिंग क्‍लासचे पेव फुटल्यामुळे शाळांतील कमी झालेली हजेरी तसेच पालकांची मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या लुटीविषयी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू, अॅॅड. पराग अळवणी यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. अनेक शाळांमधून ठराविक क्‍लासमध्ये घालण्यास विद्यार्थ्यांवर सक्ती केली जाते. यामुळे पालकांची व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर लूट केली जात आहे. त्याचप्रमाणे काही क्‍लासनाच आता शाळा सुरू करण्यास परवानगी दिली असल्याची बाब या लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहासमोर आणण्यात आली. त्यासंदर्भात शिक्षण मंत्री बोलत होते.

राज्यातील खासगी शिकवणी क्‍लासवर नियंत्रण आणण्यासाठी अधिनियम तयार करण्याचा मसुदा तयार करण्यात येत आहे. यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. हा अहवाल सादर करण्यात आला असून याविषयीचा कायदा करण्यासाठीची कार्यवाही सुरू करण्यात आल्याचे तावडे म्हणाले.

इंटिग्रेटेड कोचिंग क्‍लासेसवर कारवाई

राज्यातील शाळांना इंटिग्रेटेड कोचिंग क्‍लासची कीड लागली आहे. अनेक शाळांमध्ये इंटिग्रेटेड कोचिंग क्‍लास पद्धत राबविली जात आहे. कोचिंग क्‍लासमुळे अनेक शाळांतील उपस्थितीच कमी झाली आहे. हे रोखण्यासाठी अशा शाळांमध्ये जीओटॅगिंग सिस्टमद्वारे बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात येणार असून अशा प्रकारे इंटिग्रेटेड कोचिंग क्‍लास चालवणाऱ्या शाळांवर कारवाई करून प्रसंगी त्यांची मान्यताही रद्द केली जाईल, अशी घोषणा तावडे यांनी केली. यामुळे विद्यार्थी वर्गात हजर होता की नाही हे कळणार असून जर विद्यार्थ्यांची हजेरी कमी राहिल्यास त्याला परीक्षेला बसू दिले जाणार नाही असेही तावडे म्हणाले.

दहावीच्या परीक्षेतील ऑब्जेक्‍टिव्ह कमी करणार

राज्यातील दहावी-बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांची स्थिती घोकंपट्टीमुळे “पुढचे पाठ आणि मागचे सपाट’ होऊ नये यासाठी राज्य सरकारकडून परीक्षा पद्धतीत बदल करण्यात येणार आहे. यासाठी एनसीआरटीच्या धर्तीवर राज्यातही बारावीच्या परीक्षेत अकरावी-बारावी दोन्हीच्या अभ्यासक्रमात केला जाणार आहे. त्याचप्रमाणे दहावीच्या परीक्षेत मिळणाऱ्या भरमसाठ गुणांना आळा घालण्यासाठी प्रश्नपत्रिकेतील ऑब्जेक्‍टिव्ह प्रश्न कमी करून सबजेक्‍टिव्ह प्रश्नांवर अधिक भर देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने अभ्यासक्रमातही बदल केला जाणार असल्याची माहिती विनोद तावडे यांनी दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत