घरपोच दारुचा निर्णय नाहीच, मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात रविवारी असंख्य तक्रारी आल्या. या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास चुकीचा पायंडा पडेल, असे यात म्हटले होते.

रायगड माझा वृत्त

घरपोच दारुची सुविधा सुरु करण्यासंदर्भात राज्य सरकार सकारात्मक असल्याचे वृत्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावले आहे. अशा स्वरुपाचा कोणताही निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही आणि घेणारही नाही, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

मद्यप्राशन करुन वाहन चालवल्याने होणारे रस्ते अपघात रोखण्यासाठी राज्य सरकारने घरपोच दारुची सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त दोन दिवसांपूर्वी प्रकाशित झाले. ही बातमी वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर पसरली. राज्य सरकारच्या निर्णयावर अनेक समाजसेवी संघटनांनी आक्षेप घेतला. राज्य सरकार मद्यप्राशनाला प्रोत्साहन देत आहे, अशी टीकाही अनेकांनी केली. उत्पादनशूल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये या निर्णयासाठी सरकार अनुकूल असल्याचे म्हटल्याने राज्य सरकारच्या अडचणीत भर पडली. ज्या पद्धतीने इ-कॉमर्स वेबसाइट इतर वस्तू घरपोच करतात. त्याच माध्यमातून दारुही घरपोच पुरवण्यात येईल, असे त्यांनी म्हटले होते.

अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी घरपोच दारुची सुविधा देण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे स्पष्ट केले. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर प्रतिक्रिया दिली. राज्य सरकारच्या या निर्णयावर रविवारी अनेकांनी आक्षेप नोंदवला. या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास चुकीचा पायंडा पडेल. यामुळे मद्यपान आणि अवैधरित्या दारुचा पुरवठा करणे यास पाठबळ मिळेल, असे समाजसेवी संघटनांचे म्हणणे होते. तर वैद्यकीय क्षेत्रातूनही या निर्णयाचा विरोध करण्यात आला होता. तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील घुमजाव केले आहे. सरकारने यासंदर्भात अद्याप कोणतेही धोरण आखलेले नाही, असे त्यांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत