घाटकोपरच्या जलतरणपटूचा मालवणमध्ये समुद्रात मृत्यू

मालवण : रायगड माझा ऑनलाईन 

 

राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत सहभागी झालेले अरुण मारुती वराडकर (रा. घाटकोपर) हे जलतरणपटू रविवारी सकाळी 12 च्या सुमारास चिवला बीच समुद्रात  बुडून मृत्यू पावले. शनिवारी सकाळी महिला जलतरणपटू सुरेखा गलांडे स्पर्धेसाठी सराव करताना त्यांचा बुडून मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आज दुसऱ्या जलतरणपटूचा बुडून मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती.

स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर अरुण वराडकर हे समुद्रात बुडताना निदर्शनास आले. यानंतर स्थानिक युवकांनी बोटीतून त्यांना समुद्रातून बाहेर काढले. नंतर 108 रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचार सुरू असतानाच वराडकर यांचा मृत्यू झाला.

घाटकोपरचा ग्रुप स्पर्धेत सहभागी
घाटकोपर येथील जलतरणपटूचा ग्रुप जलतरण स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शनिवारी मालवणात आला होता. या ग्रुपमध्ये  20 जणांचा समावेश होता. या ग्रुपमधील सदस्यांनी शनिवारी चिवला बीच येथे पोहण्याचा सराव केला. या पोहण्याच्या सरावात अरुण वराडकर हेदेखील सहभागी झाले होते. रविवारी पोहण्याच्या स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अरुण वराडकर यांनी आपले कपडे ग्रुपमधील एका सदस्याकडे दिले होते. ग्रुपमधील अन्य सदस्यही पोहण्याच्या स्पर्धेत सहभागी झाल्याने अरुण वराडकर समुद्रात बुडाल्याची माहिती त्यांच्या ग्रुपमधील सदस्यांना दुपारनंतर समजली, मात्र घटना समजल्यावर ग्रुपमधील सदस्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत