घाणेरड्या रेल्वे स्थानकांमध्ये मुंबईतल्या ‘या’ तीन स्थानकांचा समावेश

मुंबई – रायगड माझा ऑनलाईन टीम

पंतप्रधान मोदी सत्तेत आल्यापासून देशभरामध्ये सर्वच स्तरातून स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. मात्र तरीदेखील या अभियानाला हवा असलेला प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. नुकत्याच एका अहवालातून ही बाब पुन्हा एकदा उघडकीस आली आहे. एका पहाणीमध्ये देशातील १० अस्वच्छ स्थानकांची यादी जाहीर करण्यात आली. या अस्वच्छ स्थानकांमध्ये कुर्ला, ठाणे आणि कल्याण या स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे.

या पाहणीअंतर्गंत ११ ते १७ मे या कालावधीमध्ये प्रत्येक स्थानकाचे निरीक्षण करण्यात आले त्याचप्रमाणे स्थानकांवरील प्रवाशांची मतेदेखील विचारात घेतली गेली. प्रवाशांनी दिलेल्या मतांमुळे कल्याण तिस-या स्थानावर, कुर्ला पाचव्या स्थानावर तर ठाणे आठव्या स्थानावर असल्याचे दिसून आले.

अहवाल सादर झाल्यानंतर या स्थानकांमधील अस्वच्छतेची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानुसार कल्याण स्थानकातून दररोज २.१५ लाख प्रवासी प्रवास करत असतात.त्याचप्रमाणे या स्थानकात लोकल गाड्यांव्यतिरिक्त लांब पल्ल्याच्या गाड्यांनादेखील थांबा देण्यात येतो. या सततच्या प्रवाशांच्या वर्दळीमुळे स्थानकातील स्वच्छता कायम ठेवणे अशक्य असते, असे आढळून आले. मात्र तरीदेखील ५८.७४ टक्के प्रवाशी स्थानकातील अस्वच्छतेबाबत नाखूश असल्याचे आढळून आले. कल्याण स्थानकाप्रमाणेच कुर्ला आणि ठाण्यात हीच परिस्थिती असून येथील प्रवाशांनीही अनुक्रमे ५५.८९ आणि ५५.७२ टक्के आपली नाराजी व्यक्त केली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत