चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध लक्ष्मण माने लढणार

कोल्हापूर : रायगड माझा वृत्त

राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील जेथून जी निवडणूक लढवतील त्यांच्याविरुद्ध निवडणूक लढणार असल्याची घोषणा पद्मश्री लक्ष्मण माने यांनी केली. येथे आयोजित पत्रकार परिषदेत खुद्द माने यांनीच ही माहिती दिली.

वंचित बहुजन विकास आघाडीकडून निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंगळवारी (ता. १२) आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर व एम.आय.एम.चे नेते असदोद्दिन ओवैसी यांची सभा होणार आहे. यात जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करणार असल्याचे माने यांनी स्पष्ट केले.

श्री. माने म्हणाले, ‘‘समाजात तेढ निर्माण करण्याचे काम भाजप व आरएसएस करीत आहे. राज्यात दुष्काळी स्थिती आहे. अजूनही चारा छावण्या सुरू नाहीत. पाण्याचे टॅंकर नाहीत. ग्रामीण भागात आणि विशेषत: दुष्काळी भागात अत्यंत हातघाईची परिस्थिती आहे. असे असताना सरकार नेमके करते काय, असा प्रश्‍न माने यांनी उपस्थित  केला. अशा बेजबाबदार सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठीच वंचित आघाडी निवडणूक लढवत आहे.

मंत्री पाटील हे आरएसएसवाले आहेत. त्यांची वक्‍तव्ये ही समाजासाठी घातक आहेत. म्हणूनच यांच्याविरोधात लढणार असल्याचे माने यांनी स्पष्ट केले. ओबीसींसाठी त्यांना दोन वकील उभे करता आले  नसल्याचे त्यांची सर्व वक्‍तव्ये आम्ही योग्य वेळी सांगू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जागावाटपाबाबत चर्चा नाही
देशात मोदी आणि भागवत यांचे हे जातीयवादी सरकार आहे. एक दिल्लीतून, तर दुसरे नागपुरातून चालत आहे. ते उलथवून टाकण्यासाठी सर्वजण एकत्र येत आहेत. काँग्रेसशी जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, ते चालढकल करीत आहेत. आम्हीही काँग्रेसची वाट न बघता सभा घेऊन आमचे उमेदवार जाहीर करीत आहोत. निवडणुकीचे अर्ज दाखल करेपर्यंत आमची चर्चा होत राहील, असेही माने यांनी स्पष्ट केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत