चंद्रपुरात आढळला पाषाणयुगीन हत्यार निर्मितीचा कारखाना

चंद्रपूर : रायगड माझा वृत्त 

chandrapur

चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या वास्तुचा आराखडा पूर्णत्वास येत असतानाच या अधिग्रहीत जमीनीवर एक मौल्यवान अश्मयुगीन स्थळ असून  दीड लाख वर्षांपासून पाषाणयुगीतील हत्यार निर्मितीचा हा कारखाना होता, असे संशोधनातून समोर आले आहे. याची दखल राज्य शासनाने घेतली आहे. शहरालगतच्या ज्या पापामिया टेकडीवर हा पाषाणयुगीन वारसा सापडला तिथे आता पर्यटन स्थळ आणि एक मोठे संग्रहालय उभे केले जाणार आहे.

चंद्रपुरातील अमित भगत या पुरातत्व अभ्यासकाला वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिग्रहीत जागेवर एक मौल्यवान अश्मयुगीन स्थळ असल्याची माहिती गॅझेटिअर मधून मिळाली. त्याने स्थळी संशोधन सुरू केले. वैद्यकीय महाविद्यालयाच्या १०० एकर पैकी सुमारे १० एकर जागेवर सुमारे दीड लाख वर्षांपूर्वी अश्मयुगीन मानवाचे वास्तव्यस्थळ आढळून आले.  राज्यातील सर्वात मोठे दगडी हत्यार निर्मितीचे स्थळ असावे एवढी अश्मयुगीन अवशेषांची श्रीमंती या स्थळी आढळली आहे. याचे पुरावे पुरात्तव खात्याच्या १९६१ पासूनचा वार्षिक अहवालात नमूद आहेत.

या अश्मयुगीन संपदेचे संरक्षण आणि संवर्धन झाले पाहिजे, यासाठी अमित भगत यांनी लोकप्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजविले. याचे महत्व पटवून दिले. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी या स्थळाची महतीचा एक विस्तृत अहवाल, विविध संदर्भसूचीसह भगत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडे पाठविला.
या स्थळाचे आणखी बारीक-सारीक तपशील गोळा केले गेले. शेवटी मुख्यमंत्री कार्यालयाला केलेली विनंती कामी आली. त्यानुसार १५ नोव्हे रोजी मंत्रालयात एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. यात तब्बल १८ सर्वोच्च अधिकारी सहभागी झाले. हे स्थळ वाचविण्यासाठी प्रस्तावित महाविद्यालयाचा निधी आणि राज्य सरकार आपला वाटा देणार आहे.

या बैठकीत पापामिया टेकडीवर स्थळाच्या जागी ७५ टक्के भागात राज्य पुरात्तव विभाग आणि पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयाच्या चमू उत्खनन करणार आहेत. या खोदकामातून मिळालेल्या वस्तू, हत्यारं आणि अश्मयुगीन जीवाश्म साहित्य यांचे याच स्थळी एक संग्रहालय उभे केले जाणार आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे या १० एकर अश्मयुगीन स्थळांपैकी पाव भाग संरक्षित करून त्यावर काच आवरण तयार करून पर्यटकांना प्रत्यक्ष हे अश्मयुगीन साहित्य जसेच्या तसे बघण्याची संधी मिळणार आहे. यासाठी लागणारा निधी राज्य सरकार आणि चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विभागून खर्च करणार आहे. शहराच्या लगत असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे चंद्रपूर पर्यटनाच्या जागतिक नकाशावर आहे. आता राज्य सरकार, आरोग्य विभाग आणि चंद्रपूरकर या अश्मयुगीन स्थळाकडे संधी रूपात बघणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत