चंद्राबाबू नायडू घेणार राहुल गांधी आणि शरद पवारांची भेट

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

गेल्या काही दिवसांपासून थंडावलेल्या भाजपविरोधी तिसऱ्या आघाडीच्या चर्चेला पुन्हा वेग येण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू गुरुवारी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, दुपारी १२.३० च्या सुमारास चंद्राबाबू शरद पवारांना भेटतील.

त्यामुळे या भेटीत तिसऱ्या आघाडीसंदर्भात काही ठोस निर्णय होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला सत्तेच्या खुर्चीवरुन खाली खेचण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येत तिसरी आघाडी स्थापन करण्याची तयारी सुरु केली होती. मात्र, या आघाडीचे नेतृत्व कोणाकडे द्यायचे यावरून सुरु असलेल्या वादामुळे या आघाडीबाबत आतापर्यंत ठोस निर्णय होऊ शकला नव्हता.

तसेच मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मायावती यांच्या बसपाने काँग्रेसशी युती न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे तिसऱ्या आघाडीची चर्चा थंडावली होती. परंतु, आता चंद्राबाबू यांच्या पुढाकारामुळे या चर्चेला पुन्हा वेग येऊ शकतो. यासंदर्भात चंद्राबाबू यांनी शनिवारी मायावती यांचीही भेट घेतली होती.

त्यामुळे आता राहुल गांधी आणि शरद पवार चंद्राबाबू नायडू यांना कशाप्रकारे प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत