चहा विकणारे पंतप्रधान मुलांना रस्त्यावर उतरुन पुन्हा तेच करा म्हणतात

सांगली : रायगड माझा वृत्त

केंद्र व राज्यातील भाजप सरकार उद्योग, व्यवसाय, विकास, बेरोजगारांना नोकऱ्या, शेतकरी कर्जमाफीत अपयशी ठरले आहे. “भाजप’ हटाओचा नारा देत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. चहा विकणारे पंतप्रधान मुलांना रस्त्यावर उतरुन पुन्हा तेच करण्यास सांगत आहेत, असा आरोपही राष्ट्रवादीने आंदोलना दरम्यान केला.

विलिंग्डन महाविद्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर पोलिसांनी मोर्चा अडवला. मोर्चात तरुणांची संख्या चांगली होती. कार्यकर्त्यांनी सत्ताधारी भाजप सरकारच्या अपयशाच्या फलक फडकावले.

राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील, कार्याध्यक्ष अविनाश पाटील, शहरजिल्हाध्यक्ष संजय बजाज, शहर युवक अध्यक्ष राहुल पवार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. सर्वच वक्‍त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.

राष्ट्रवादी पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांना मागण्यांचे निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की. साडेचार वर्षांपूर्वी आश्‍वासने देऊन ती पूर्ण करण्यात सत्तेवर आलेल्या केंद्र व राज्यातील भाजप सरकारला अपयश आले आहे. चुकीच्या धोरणांमुळे उद्योग-व्यवसायांची वाताहात होऊन बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. चहा
विकणारा पंतप्रधान मुलांना रस्त्यावर उतरुन पुन्हा तेच करा, असे सांगतोय.

जिल्ह्यातील 467 गावांत दुष्काळ जाहीर केला; मात्र उपायोजनांचा पत्ताच नाही. भाजपने गाजर दाखवले आहे. त्यांना मिळणारे लाभ प्रत्यक्षात दिले जात नाहीत.
भाजपने केद्रात सत्तेत येण्यापूर्वी भाजपने दरवर्षी 2 कोटी युवकांना रोजगाराचे आश्‍वासन दिले. प्रत्यक्षात सत्तेत आल्यानंतर चुकीच्या धोरणांमुळे बेरोजगाराचा उच्चांक गाठला आहे. मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्टॅंडअप इंडिया, प्रधानमंत्री युवा योजना याचा मोठा गाजावाजा करीत रोजगार निर्मितीचा भास निर्माण केला जातोय.

विद्यार्थी संघटनेचे स्वनिल पाटील, ताजुद्दीन मुलाणी, भारत देशमुख, माजी महापौर सुरेश पाटील, माजी झेडपी सदस्य आप्पासाहेब हुळ्ळे, प्रमोद इनामदार, विष्णू माने प्रमुख सहभागी झाले होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत