चिक्की उत्पादक कंपन्यांवर कारवाई

पुणे : रायगड माझा वृत्त

अन्न सुरक्षा कायद्याच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पुण्यासह जिल्ह्यातील तीन चिक्की उत्पादक कंपन्यांना निकषांची पूर्तता होईपर्यंत उत्पादन आणि विक्री थांबविण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दिले आहेत. अस्वच्छता, प्रयोगशाळेचा अभाव आणि देखरेखीसाठी सक्षम व्यक्तीचे निकष पाळले न गेल्याने ही कारवाई करण्यात आली.

लोणावळयातील तिवारी फूड्‌स प्रॉडक्ट, हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथील स्नेहा फूड प्रॉडक्टस आणि कोंढव्यातील त्रिशूल चिक्की प्रॉडक्टस अशी कारवाई केलेल्या कंपन्यांची नावे आहेत. मध्यंतरी मगनलाल चिक्की कंपनीची तपासणी करण्यात आल्यानंतर अन्य कंपन्यांकडे ‘एफडीए’ने मोर्चा वळविला. त्या दरम्यान, मगनलाल चिक्कीला निकषांची पूर्तता करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता उर्वरित चिक्की कंपन्यांच्या तपासणीची मोहीम ‘एफडीए’ने हाती घेतली. त्यात काही त्रुटी आढळल्याने ‘एफडीए’चे सहआयुक्त सुरेश देशमुख यांनी ही कारवाई केली. सहआयुक्त सुरेश देशमुख यांच्या आदेशानुसार सहायक आयुक्त संपत देशमुख, संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी गणपत कोकणे, राजेंद्र काकडे, इम्रान हवालदार व संतोश सावंत यांच्या पथकाने केली.

या तिन्ही ठिकाणच्या चिक्कीच्या कंपन्यांची तपासणी केली असता त्यामध्ये काही त्रुटी आढळल्या. मानवी सेवनास सुरक्षित, सकस व निर्भेळ अन्न पदार्थ उपलब्ध करून देणे हा अन्न सुरक्षा कायद्याचा मुख्य उद्देश आहे. उत्पादकाकडे स्वतःची प्रयोगशाळा असावी आणि त्या प्रयोगशाळेत उत्पादनाची तपासणी करणे अपेक्षित आहे. स्वतःची प्रयोगशाळा नसल्यास अन्न सुरक्षा मानदे कायद्यान्वये एनएबीएल प्रयोगशाळेत तपासणी करणे आवश्यक तसेच बंधनकारक आहे. कंपन्यांमध्ये होणाऱ्या उत्पादनावर लक्ष ठेवण्यासाठी शैक्षणिक पात्रता धारक केलेल्या व्यक्तींची नेमणूक करणे गरजेचे आहे. चिक्की उत्पादनासाठी वापरण्यात येणारे पाणी पिण्यास योग्य असल्याची खातरजमा करून घेणे गरजेचे आहे. या निकषांची पूर्तता करणे गरजेचे आणि बंधनकारक आहे. ती न केल्याप्रकरणी कोंढवा, लोणी काळभोर तसेच लोणावळ्यातील तीन चिक्की उत्पादकांवर कारवाई करण्यात आली. निकषांची पूर्तता होईपर्यंत चिक्कीचे उत्पादन थांबवावे तसेच त्याची विक्रीदेखील करू नये, असे आदेश ‘एफडीए’ने दिले आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत