चिमुकल्यांची पायपीट संपता संपेना…

रायगड माझा वृत्त 

टाकवे बुद्रुक – आंदर मावळच्या पूर्व भागातील ठाकरवाडीतील मुले-मुली दररोज खड्‌डे, चिखल, शेतीचे बांध तुडवत पाच किलोमीटर पायपीट करीत मुळाक्षरे गिरवतात. पाचवीला पुंजलेले दारिद्य्र, आणि निरक्षरता अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये बालचमू शिक्षण घेत आहेत. नवलाख उंब्रेतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ते घर अशी दररोज 10 किलोमीटरची पायपीट त्यांच्या पिच्छा सोडायचे नाव घेत नाही.

मिंडेवाडीजवळील ठाकरवस्तीमध्ये अनेक वर्षांपासून हे आदिवासी स्थायिक झाले आहेत. अनेक पिढ्यांची साधी अक्षर ओळखही झाली नाही. दररोजच्या आयुष्यात दैनंदिन व्यावहारिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. व्यव्हारीक अडचणींना तोंड देत असल्याची भावना निर्माण झाली आहे. दरम्यान, शासनानेही शिक्षण हक्‍क कायदा काढला. त्याची अंमलबजावणीही सुरू केली. त्यातून वाड्या-वस्त्यांवर शिक्षणाची गंगा पोचली खरी मात्र तुलनेने आवश्‍यक भौतिक सुविधांची वानवा दिसून येत आहे.

किमान मूलभूत सुविधा उपलब्ध होऊन आमच्या लेकरांची पायपीट कधी थांबेल ?, असा सवाल आता आदिवासी बांधव उपस्थित करीत आहेत. छकुली खंडागळे, शारदा भांगरे, ज्योती भांगरे, धनश्री भांगरे, कल्पना भांगरे, अर्चना भांगरे, वैशाली भांगरे या चिमुरड्यांनीही केवळ एवढीच अपेक्षा व्यक्‍त केली आहे.

सावित्रींच्या लेकींची मैलोन्‌मैल पायपीट
वस्तीवर ना एसटी बस आली, ना खासगी वाहनाची सोय… त्यामुळे ठाकरवाडीत 50 घरे आहेत. शंभर-दोनशे लोकसंख्या असलेल्या या वस्तीतील 25 मुले-मुली शिक्षण घेत आहेत. त्यात मुलींची संख्या अधिक आहे. पालकांनी या मुलांची सोय शासकीय आश्रमशाळेत केली आहे. मात्र, मुली वस्तीत राहूनच शिक्षण घेत आहेत. त्याबरोबर मैलोन्‌मैल पायपीटही करीत आहेत. वस्तीजवळील बधालेवाडी, जाधववाडी, मिंडेवाडी, नवलाख उंब्रेतील विद्यार्थी महागड्या इंग्रजी शाळेत स्कूल बस, खासगी वाहनातून जातात. या गावाच्या पलिकडे पाहिल्यास पायपीट करत, चिखल तुडवत जाणारी लेकरे दिसतात. हा विरोधाभास पाहिल्यानंतर असमान विकास डोळ्यात खुपतो.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत