चीनमधील प्राथमिक शाळेत चाकूने हल्ला; २० मुले जखमी

बिजिंग (चीन) : रायगड माझा ऑनलाईन

चीनची राजधानी बिजिंगमधील एका प्राथमिक शाळेत झालेल्या हल्ल्यात २० मुले जखमी झाल्याची गंभीर घटना घडली आहे. यातील तीन मुलांची प्रकृती गंभीर आहे. हल्लेखोराने हातोडा सदृश्य वस्तूने हा हल्ला केला असल्याचे मुलांच्या पालकांनी सोशल मीडिया अकाउंटवरून सांगितले आहे. तर मुलांवर चाकूने हल्ला झाला असल्याचे वृत्त आहे.

याबाबत शिचेंग जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुले धावण्याचा सराव करत असताना ही घटना घडली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. मुलांवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला अटक केली आहे.

दरम्यान, शाळेत मुलांवर हल्ला करणारा व्यक्ती हा शाळेतील माजी कर्मचारी असल्याची माहिती पुढे आली आहे. नोकरीचा परीविक्षा काळ पूर्ण करणे अयशस्वी ठरल्याने त्याने संतप्त होऊन मुलांना लक्ष्य केले. ज्या शाळेत हल्ल्याची घटना घडली आहे; ती बिजिंगमधील शिचेंग जिल्ह्यातील नावाजलेली शाळा आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत