चेंबूरमध्ये क्षुल्लक कारणातून तरुणाची हत्या

 

मुंबई : रायगड माझा 

सोमवारी मध्यरात्री चेंबूर येथे क्षुल्लक कारणावरून एका तरुणाची हत्या झाली. टॅक्सीचालक आणि मृत तरुणाची भाडय़ाच्या पैशावरून बातचीत सुरू असताना आरोपींनी मध्यस्थी करत वाद घातला. वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन चौघांनी सुरेंद्र सिंग (३६) या तरुणाला डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून ठार मारले. मुख्य आरोपीसह तिघा अल्पवयीन मुलांना पोलिसांनी अटक केली आहे.

चेंबूर परिसरात राहणारे रामबाबू महादेव सविता, ब्रज आणि सुरेंद्र हे तिघे सोमवारी मध्यरात्री अडीच वाजता टॅक्सीने चेंबूर वसाहत बस स्टॉपजवळ आले. तेथे एका हॉटेलसमोर टॅक्सी थांबवून तिघेही उतरले. मात्र त्यांची भाडय़ाचे पैसे सुटे देण्या-घेण्यावरून टॅक्सीचालकाबरोबर बातचीत सुरू होती. तेवढय़ात कृष्णा नावाचा तरुण त्याच्या अन्य तिघा मित्रांसोबत तेथे गेला व चालकाशी वाद काय घालतो असे म्हणत त्यांनी सुरेंद्र याच्याशी वाद घातला. कृष्णा बोयन्ना (१८)व त्याचे मित्र दारू प्यायलेले होते. वाद सुरू असताना दोन्ही गट हमरीतुमरीवर आले. धक्काबुक्की सुरू असतानाच कृष्णाने रस्त्यावर पडलेला पेव्हर ब्लॉक सुरेंद्रच्या डोक्यात घातला. सुरेंद्र रक्ताच्या थारोळय़ात रस्त्यात पडताच आरोपींनी चालकाचा दमदाटी करून पळ काढला. याप्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट-६ ने शोधमोहीम राबवून कृष्णा व त्याच्या अल्पवयीन तिघा साथीदारांना अटक केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत