चोरीत अडसर ठरणाऱ्या गाववाल्याची हत्या, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मुंबई : रायगड माझा वृत्त

गेल्या शुक्रवारी आग्रीपाडा येथे फर्निचर बनविण्याच्या गोदामात सफाई काम करणाऱ्या तरुणाची हत्या करणाऱ्या आरोपीला आग्रीपाडा पोलिसांनी दिल्लीत जाऊन पकडले. अटक आरोपी हा मृत तरुणाचा गाववाला होता. गोदामात चोरी करायची असल्यामुळे आरोपीने हत्या केली होती, पण त्याचा हा डाव फसला आणि तो गजाआड गेला.

मोहम्मद शकिल सय्यद अली हा तरुण गेल्या आठ महिन्यांपासून आग्रीपाडा येथील फर्निचर बनविणाऱ्या कंपनीच्या गोदामात कामाला होता. तेथे तो सफाई काम करीत होता आणि तेथेच राहत होता. 30 नोव्हेंबर रोजी अलीचा गोदामामध्ये चाकूने भोसकलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. त्यामुळे आग्रीपाडा पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम आगवणे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय नागेश पुराणिक, उपनिरीक्षक अर्जुन कुदळे आदींच्या पथकाने तपास सुरू केला. तेव्हा मोहम्मद शकिल सय्यद अली याला शेवटचे राजबाबू कोयले मन्सुरी याच्यासह पाहिल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यामुळे मन्सुरीचा शोध सुरू केल्यावर तो दोन टाकी येथे फुटपाथवर राहत असल्याचे तेवढे समजले. त्याबाबत अन्य कुठही माहिती उपलब्ध नव्हती. तेव्हा राजबाबू हा अलीचा गाववाला असल्याचे खबर पोलिसांना मिळाली. मग तो धागा पकडून तपास केल्यावर राजबाबू दिल्लीत त्याच्या एका नातेवाईकाकडे गेला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने दिल्ली गाठून राजबाबूला ताब्यात घेतले. राजबाबूने गुह्याची कबुली दिली. अली काम करीत असलेल्या गोदामात चोरी करायची होती, पण अली अडसर ठरत असल्यामुळे त्याची हत्या केली असे राजबाबूने सांगितल्याचे आगवणे यांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत