चौपदरीकरणाच्या कामामुळे अपघाताचे प्रमाण वाढले

धोकादायक ठिकाणांची माहिती कळवून उपाययोजना करण्याची पोलिसांची सूचना

पोलादपूर : रायगड माझा वृत्त

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या वेगाने सुरु असून, या कामांमुळे महामार्गावर अपघाताचा धोका वाढू शकतो, हे गृहित धरुन महाड महामार्ग पोलिस विभागाने खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना राष्ट्रीय महामार्ग विभाग तसेच चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कंपनीला केल्या आहेत. इंदापूर ते महाड मार्गावरील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करावे आणि धोकादायक ठिकाणांची माहिती कळवून उपाययोजना करण्याचे आवाहन केले.

Image result for mumbai goa road under work

महाड ते इंदापूर या 57 किमीदरम्यान सध्या चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. हे काम करत असताना अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला डोंगर पोखरण्यात आलेले आहेत. तर मोऱ्यांची कामे सुरु असल्याने मोऱ्या तुटलेल्या आहेत. माणगाव, लोणेरे, गांधारपाले, नडगाव, पोलादपूर येथे असलेले पूल, पार्लेवाडी येथील मोरीचे तुटलेले कठडे अपघाताला कारणीभूत ठरु शकतात. त्यादृष्टीने येथील पाहणी केली जावी असेही पोलिस यंत्रणेने सूचवले आहे.

दासगाव येथील खिंड यावर्षी अधिक धोकादायक झाली असून, याठिकाणी सुरक्षित जाळी बसवली जावी अशी सूचना करण्यात आली. वहूर, केंबुर्ली, साहिलनगर येथे मोठ्या प्रमाणात डोंगर खोदाई झालेली आहे.

पावसाळ्यात येथील माती रस्त्यावर येण्याची शक्यता तसेच मोऱ्या बुजल्याने पाणी रस्त्यावर येण्याची शक्यता महामार्ग पोलिसांनी वर्तवली आहे. पावसाळ्यातील वाहतूक, गणपतीत चाकरमान्याचा प्रवास व सावित्री पूल दुर्घटना याचा विचार करता या मार्गावर प्रवाशाचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी महाड महामार्ग पोलिस केंद्राने हे पाउल उचलले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दत्तात्रय गाढवे यांनी दिली.

राष्ट्रीय महामार्ग विभाग तसेच चौपदरीकरणाचे काम करणारी कंपनी यांनी याबाबत खबरदारी घ्यावी, यासाठी संबंधित विभागांना पत्रव्यवहार करुन अहवालही मागविण्यात आला आहे

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत