जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला! राष्ट्रवादीच्या धोरणावर केले भाष्य

मुंबई:रायगड माझा

राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री जयंत पाटील यांनी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत आज प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर पाटील यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण केले. महाराष्ट्र हा कष्टकरी आणि गुणवान लोकांचा प्रदेश आहे. महाराष्ट्राने वेळोवेळी सर्वच क्षेत्रांत देशाचे नेतृत्व केले आहे. यापुढील काळातही नेतृत्वाची ही उज्वल परंपरा अशीच सुरू राहावी, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

सोबतच जयंत पाटील यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांना हुतात्मा चौकात आदरांजली वाहिली. यशवंतराव चव्हाण आणि पंडित नेहरू यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याचा निर्णय घेतला. मात्र आजही सीमा प्रश्न प्रलंबित असल्याचे मला दु:ख आहे. आजही संघर्ष सुरू आहे. महाराष्ट्र दिनाचा आनंद तर आहेच मात्र बेळगाव आणि त्या परिसरातील लोकांच्या भावनांचाही आम्ही मान राखतो, असे पाटील यांनी सांगितले.

यानंतर जयंत पाटील यांनी पक्षाशी निगडीत अनेक बाबींवर त्यांनी भाष्य केले. जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एक रचना, व्यवस्था आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही भागावर अन्याय होणार नाही याची पक्ष काळजी घेतो. माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे रायगडचे आहेत, धनंजय मुंडे हे बीडचे आहेत, यावरून हे स्पष्ट होते. राष्ट्रवादी हा तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचलेला पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन जाणारी पार्टी आहे. आमच्यात कोणताही भेद पाळला जात नाही. आम्ही सर्व समाजाला सोबत घेऊन पुढची निवडणूक लढवणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

मागील निवडणुकीत पराभव झाला म्हणजे आमचा पक्ष संपला असं नाही. आमचा कार्यकर्ता आजही लढतोय. मागील निवडणुकीत शहरी भागात पक्षाचा पराभव झाला असला तरी भाजपने खोटे बोलून मतं घेतली. परंतु आता सरकारच्या विरोधात जनक्षोभ होत असून लोक आम्हाला प्रचंड प्रतिसाद देत आहेत, हे हल्लाबोल आंदोलनादरम्यान आम्ही पाहिले, असे पाटील यांनी सांगितले.

अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे की जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र असती तर भाजपला तिथे यश लाभलं नसतं. त्यामुळे समविचारी मतांचे विभाजन होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे त्यांनी नमूद केले. भाजपने गुन्हेगार आणि बदनाम लोकांना पक्षात घेतले आम्ही तसे करणार नाही. आम्ही बेरजेचे राजकारण करणारे कार्यकर्ते आहोत. जे लोक समविचारी असतील अशांना पक्षात जागा देऊ. अर्थातच स्थानिक कार्यकर्त्यांचे मन नाराज केले जाणार नाही. त्यांचे मत ग्राह्य धरले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळात विरोधकांची भूमिका प्रामाणिकपणे बजावत आहे. शिवसेनेने अनेकदा मुद्दा काढून त्यातून माघार घेतली मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने असे कधी केले नाही. रस्त्यावरची लढाई तर आम्ही लढतच आहोत. संघर्षयात्रा आणि हल्लाबोल आंदोलन हे त्याचे त्याचे ताजे उदाहरण आहे, असे ते म्हणाले. तसेच, अहमदनगर येथील दुहेरी हत्याकांडाच्या प्रकरणाशी पक्षाचा कोणताही संबंध नाही, असे त्यांनी जाहीर केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत