जळगावसाठी राष्ट्रवादीकडून उज्ज्वल निकम यांच्या नावावर चर्चा

Ujjwal Nikam

जळगाव : रायगड माझा वृत्त

जळगाव लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे उमेदवारीसाठी राज्याचे विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांच्या नावावर चर्चा झाली. मात्र, त्यांची सहमती घेतल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी अरुणभाई गुजराथी व माजी आमदार संतोष चौधरी यांच्या नावाबाबत चर्चा झाली.

आगामी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक आज मुंबई येथील पक्ष कार्यालयात झाली. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री छगन भुजबळ, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यावेळी उपस्थित होते. तर जळगाव जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील, आमदार डॉ. सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी खासदार ऍड. वसंतराव मोरे, महानगराध्यक्ष नामदेव चौधरी, माजी आमदार संतोष चौधरी आदी उपस्थित होते. दुपारी साडेबाराला जळगाव व रावेर लोकसभेच्या उमेदवारीबाबत चर्चा करण्यात आली.

..यांच्या नावावर चर्चा 
याबाबत जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील यांनी सांगितले, जळगाव लोकसभेसाठी माजी खासदार ऍड. वसंतराव मोरे, अमळनेरचे माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल भाईदास पाटील, चाळीसगाव येथील प्रमोद पाटील यांच्या नावाची चर्चा झाली. तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी माजी विधानसभा सभापती अरुणभाई गुजराथी यांचे नाव सुचविण्यात आले. माजी आमदार संतोष चौधरी यांच्याही नावाबाबत चर्चा करण्यात आली.

निकम यांच्याशी अरुणभाई बोलणार 
या बैठकीत जळगाव लोकसभेच्या उमेदवारीसाठी राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नावाबाबतही चर्चा करण्यात आली. त्यांचे नाव सुचविण्यात आल्यानंतर त्यावर सहमती झाली. मात्र, ऍड. निकम यांची सहमती घेतल्यानंतरच त्यासंदर्भात पुढील प्रक्रिया करण्यात येईल. विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी यांच्याकडे ऍड. निकम यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.ऍड.निकम यांचा नकार आल्यास अनिल भाईदास पाटील यांच्या नावाचा विचार होऊ शकतो.

“रावेर’ मोठ्या नेत्यांच्या प्रवेशासाठी राखीव 
रावेर लोकसभा मतदारसंघासाठी माजी विधानसभा सभापती अरुणभाई गुजराथी व माजी आमदार संतोष चौधरी यांच्या नावाची चर्चा करण्यात आली. मात्र, राज्यात वर्चस्व असलेल्या सत्ताधारी पक्षातील जिल्ह्यातील एका मोठ्या नेत्याने ऐनवेळी पक्षात प्रवेश केल्यास त्यांच्यासाठी उमेदवारी राखीव ठेवण्यात येईल, ते सांगतील त्यांना पक्षातर्फे उमेदवारी देण्यात येईल, अशीही चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत