जागावाटपाच्या चर्चेत मी नसतो: शरद पवार

 

औरंगाबाद : रायगड माझा वृत्त 

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस दावा करणार असल्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीबाबत चर्चा सुरू आहे. काही जागांच्या आदलाबदलीबद्दलही चर्चा केली जात आहे. याबद्दल पत्रकारांनी पवार यांना विचारले असता ते म्हणाले, ‘जागा वाटपाच्या चर्चेत मी नसतो. प्रदेशाध्यक्ष व काही नेत्यांवर बोलणीची जबाबदारी सोपवली आहे. ४८ जागांपैकी ५० टक्के जागांसाठी आमचा आग्रह आहे. ४०-४२ जागांबद्दल मतभेद नाहीत. दोन – चार जागांबद्दल मतभेद शिल्लक राहिले तर काँग्रेसचे अध्यक्ष व मी त्याबद्दल काय ते बघून घेऊ.’

लोकसभेच्या काही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे नाहीत, पण त्या जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असाव्यात असे लोकांचे म्हणणे आहे. त्या अनुषंगाने पुणे मतदारसंघाबद्दल चर्चा सुरू आहे. औरंगाबादची जागा काही वर्षांपासून काँग्रेसकडे आहे, पण काँग्रेसला यश आले नाही. या जागेतही बदल करण्याचे नियोजन आहे. औरंगाबादच्या बदल्यात दुसरी जागा काँग्रेसला देऊ. बदल झाल्यावर लाभ होण्याची शक्यता आहे, असे पवार म्हणाले. काही वर्षांपूर्वी साहेबराव पाटील डोणगावकर यांना लोकसभेवर निवडून आणले होते. आताही आमच्याकडे उमेदवार आहेत. सतीश चव्हाण देखील आहेत, असा उल्लेख पवार यांनी केला.

पंतप्रधानांनी भूमिका स्पष्ट करावी

सीबीआयमध्ये सध्या सुरू असलेल्या वादाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. सीबीआय ही यंत्रणा पंतप्रधानांच्या आखत्यारित येते. अर्थमंत्र्यांच्या आखत्यारित येत नाही. शिवाय ज्या दोन अधिकाऱ्यांबद्दल वाद सुरू आहे त्या अधिकाऱ्यांची नियुक्ती देखील पंतप्रधानांनी केली आहे. निवड तुम्ही केलीत, उत्तर तुम्हीच द्या, असे पवार मोदी यांना उद्देशून म्हणाले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत