जामीन मिळाल्यानंतर पहिला फोन शरद पवारांचा….

पडत्या काळात ‘मातोश्री’चा हात; नाशिकच नव्हे तर महाराष्ट्रासह संपूर्ण देशात फिरणार!

मुंबई : रायगड माझा वृत्त

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना आज केईएम रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. जामीन मिळाल्यानंतर शरद पवारांचा सर्वात पहिला फोन आला अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे. दरम्यान मी लवकरच राजकारणात सक्रीय होणार असून रुग्णालयातील सर्व तपासण्यापूर्ण झाल्यावर नाशिकच नव्हे तर महाराष्ट्रासह संपूर्ण देशात फिरणार असल्याचं भुजबळ यांनी स्पष्ट केलं.

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी जामिनावर सुटका झाल्यानंतरही छगन भुजबळ रुग्णालयातच होते. त्यांना आज डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर आज तब्बल दोन वर्षानंतर त्यांनी त्यांच्या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आरोग्याची तक्रार अजूनही संपलेली नाही. काही चाचण्यापूर्ण झाल्यानंतर पुन्हा देशभर फिरणार आहे. राजकीय कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

ज्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या नावाखाली मला तुरुंगात टाकण्यात आलं. त्या महाराष्ट्र सदनचा सर्वचजण लाभ घेत आहेत. त्याचा मला आनंदच आहे. भाजपच्या खासदारानेही ‘महाराष्ट सदन सुंदर और बनानेवाला अंदर’, अशी प्रतिक्रिया देऊन कामाला दाद दिली होती, अशी मार्मिक टिप्पणीही त्यांनी केली.

‘मातोश्री’चा पडत्या काळात हात

शिवसेनेचा आणि आमचा २५ वर्षांपासून चांगला घरोबा आहे. २५ वर्ष आम्ही त्यांच्यासोबत राहिलो आहे, ऋणानुबंध राहिले आहेत असं सांगितलं. पडत्या काळात शिवसेनेने दोन चांगले शब्द बोलले असंही त्यांनी सांगितलं. राजकारणात पुन्हा सक्रीय होण्यासंबंधी विचारलं असताना तब्बेत सुधारल्यानंतर लोकांमध्ये जाईन असं त्यांनी सांगितलं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत