जिल्हा रुग्णालयात अपंग महिलेला लुटले

सातारा : रायगड माझा वृत्त 

अपंगांना 12 हजार रुपये मिळतात’ असे खोटे सांगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात अपंगाच्या दाखल्यासाठी आलेल्या महिलेचा विश्‍वास संपादन करून  महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र व मोबाईल हातोहात लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वीही जिल्हा रुग्णालयात फसवणुकीचे असे प्रकार घडले आहेत.  या प्रकरणी अंजना दिनकर मोरे (वय 46, रा.मसूर, ता.कराड) या महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. चोरी करणार्‍या संशयिताने आपले नाव संतोष पाटील (वय 35, रा.सातारा) असे सांगितले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार अंजना मोरे या दि. 14 रोजी अपंगाचा दाखला काढण्यासाठी जिल्हा रुग्णालयात आल्या होत्या. यावेळी संशयित संतोष पाटील याने तक्रारदार महिलेची ओळख वाढवली. अंपगांना कोर्टातून 12 हजार रुपये मिळतात, तुम्हाला पाहिजे असतील तर माझ्यासोबत कोर्टात चला, असे सांगितले. त्यावर विश्‍वास ठेवून तक्रारदार महिला संशयितासोबत    जिल्हा न्यायालयात गेल्या. न्यायालयाच्या परिसरात आल्यानंतर ‘अंगातील सोन्याचे मंगळसूत्र व मोबाईल पाहिला तर तुम्हाला मदत देणार नाहीत ते माझ्याकडे काढून द्या,’ असे संशयिताने सांगितले. तक्रारदार महिलेने संशयिताकडे 12 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र व मोबाईल असा ऐवज दिल्यानंतर संशयित कागदपत्रे तयार करायला जातो, असे सांगून तो ऐवज घेवून गेला. बराच वेळ झाल्यानंतरही संशयित येत नसल्याने महिलेने पाहिले मात्र तो तेथे नव्हता. जिल्हा रुग्णालयात  संशयित गेला असेल, असे वाटल्याने महिलेने जिल्हा रुग्णालयात जावून बघितले असता तो कोठेही दिसला नाही.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत