जिल्ह्यातील पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी सरसावले पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी

अलिबाग : प्रतिनिधी 

माथेरानच्या घोड्यांसाठी पोहोचले 1 हजार 500 किलो अश्वखाद्य

तर पुढील दोन दिवसात आणखी 2 हजार किलो अश्र्वखाद्य पोहोचणार

जिल्ह्यातील सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात मुक्या प्राण्यांवरही रोजच्या खाण्याचे संकट ओढावले आहे. विशेषत: माथेरान सारख्या ठिकाणी लॉकडाऊनमुळे पर्यटन व्यवसाय थांबल्याने तेथील घोड्यांचा खाद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या मुक्या प्राण्यांचे दु:खाची जाणीव ओळखून जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ.सुभाष म्हस्के व त्यांचे सहकारी काही सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मुक्या प्राण्यांची काळजी घेण्यासाठी पुढे सरसावले आहेत.

माथेरान या पर्यटनस्थळी जवळपास 450 घोड्यांचा वाहतुकीसाठी वापर केला जातो. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या पुढाकारातून या घोड्यांसाठी हायडॅक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने प्राथमिक स्वरुपात दि.06 मे रोजी 1 हजार 500 किलो गोदरेज ॲग्रोवेट कंपनीचे पौष्टिक अश्वखाद्य वाटपासाठी पुरविले आहे. तसेच पशुसंवर्धन विभागातर्फे पुढील दोन ते तीन दिवसात दोन हजार किलो अश्वखाद्य पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती, जिल्हास्तरीय प्राणी क्लेश समिती सदस्य व प्राणी मित्र तसेच प्राणी कल्याणाकरिता सतत झटणाऱ्या व्यक्ती यांचीही या कामी मदत घेण्यात येत आहे. श्रीमती सीमा शांतीलाल पुनमिया यांनी पंख फाऊंडेशनच्या वतीने मुक्या प्राण्यांची भूक शमवण्यासाठी फूड बँकची स्थापना केली असून पशूपालकांनी शक्यतो आपली जनावरे मोकाट सोडू नये, असेही जिल्हा पशूसंवर्धन विभागाकडून पशूपालकांना सूचित करण्यात आले आहे. त्याचबरोबर पशूसंवर्धन विभागाकडून मुक्या प्राण्यांवरील उपचार व लसीकरणाची काळजी घेण्यात येत आहे.

लॉकडाऊनच्या काळात करोना विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, हात वारंवार स्वच्छ धुणे, सोशल डिटन्सिंगचे पालन करणे तसेच ताप, सर्दी, खोकला,अंगदुखी असल्यास तात्काळ नजिकच्या शासकीय रुग्णालयामध्ये जाऊन वैद्यकीय सल्ला घेण्याबाबत पशूसवंर्धन विभागाकडून पशूपालकांना सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील भटके कुत्रे, गाई, बैल व वासरे इत्यादी प्राण्यासाठी चारा पाण्याची व्यवस्था सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. याकरिता तालुकास्तरावर सहा.आयुक्त, पशुसंवर्धन (गट-अ), पंचायत समिती स्तरावरील पशुधन विकास अधिकारी (गट-अ/ब), सहा.पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक यांना कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, तसेच भविष्यातही मुक्या प्राण्यांची उपासमार होणार नाही, त्यांना योग्य ते उपचार मिळावेत यासाठी पशुसंवर्धन विभाग प्रयत्नशील राहील, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ.सुभाष म्हस्के यांनी दिली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत