जिल्ह्यातील प्रत्येक गाव दाखले मुक्त करणार; रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा संकल्प!

श्रीवर्धन : श्रीकांत शेलार

जिल्ह्यात अनेक प्रकारचे दाखले हे महसूल विभागाकडून देण्यात येतात. त्यामुळे येत्या महसुली वर्षात रायगड मधील प्रत्येक गाव दाखले मुक्त करण्याचा संकल्प  जिल्हाधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी जाहीर केला. श्रीवर्धन मधील प्रशासकीय इमारतीत महसूल दिनी कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी निवासी जिल्हाधिकारी किरण पाणबुडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी भरत शितोळे, उपजिल्हाधिकारी श्रीधर बोधे, प्रांताधिकारी प्रवीण पवार, श्रीवर्धन तहसीलदार जयराज सूर्यवंशी, म्हसळा तहसीलदार रामदास झळके तसेच जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, तलाठी व कर्मचारी उपस्थित होते.
पुढे जिल्हाधिकारी डॉ सूर्यवंशी म्हणाले की, महसूल दिन म्हणजे वर्षभर केलेल्या कामासाठी कौतुकाची थाप देण्याचा दिवस. सर्व सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत सर्व योजना या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असल्याने लोकांच्या महसूल विभागाकडून खुप अपेक्षा आहेत.
प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याची ताकद महसूल विभागात आहे. जिल्ह्यातील गावे दाखलेमुक्त करण्यासह निराधार योजनांची अंमलबजावणी करण्याचा संकल्पही व्यक्त केला. त्यासाठी सर्व तालाठ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. कर्मचाऱ्यांनी तणावमुक्त राहावे यासाठी योगाक्लास चे नियोजन असल्याचे मानस ही जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. प्रत्येक कर्मचारी व अधिकाऱ्यांनी छोट्या छोट्या गोष्टींत आनंद मानावा असा सल्ला ही डॉ सूर्यवंशी यांनी दिला. 
महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 22 अधिकारी-कर्मचारी आणि त्यांच्या 20 गुणंवत पाल्यांचा जिल्हाधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रांताधिकारी प्रवीण पवार, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नीलिमा काप तर आभार प्रदर्शन तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी केले.
रायगड फर्स्ट रिस्पॉन्स फोर्स 
आंबेनळी घाटातील आपत्ती आल्यास तात्काळ मदत व्हावी यासाठी जिल्ह्यात रायगड फर्स्ट रिस्पॉन्स फोर्स ची टीम तयार करण्यात येणार असल्याची घोषणा जिल्हाधिकारी डॉ सूर्यवंशी यांनी महसूल दिनी केली. त्यासाठी तालाठ्यांनी गावागावातील तरुण निवडण्याची जबाबदारी तालाठ्यांवर देण्यात आली आहे.
संकल्पपूर्ती होणार का?
महसूल दिनी दाखलेमुक्त गावे, निराधार योजना अंमलबजावणी, वारसदार नाव, चावडी वाचन तसेच रायगड फर्स्ट रिस्पॉन्स फोर्स टीम असे संकल्प जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले. त्याची जबाबदारी तालाठ्यांवर टाकली आहे. मात्र सद्यस्थितीत कर्मचाऱ्यांचा तुटवडा पहाता तलाठी वर्ग यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना किती साथ देईल याबाबत साशंकता आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत