जीतेंद्र आव्हाड मनसेच्या दहीहंडी उत्सवात

ठाणे : रायगड माझा वृत्त

गेली चार वर्षे दहीहंडी उत्सवापासून दूर राहिल्याने काहीसे अस्वस्थ झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जीतेंद्र आव्हाड सोमवारी चक्क मनसेच्या दहीहंडी उत्सवातील व्यासपीठावर अवतरल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. आव्हाड यांनी जवळपास दोन तास या उत्सवात पूर्वीच्याच स्टाइलने गोविंदा पथकांमध्ये जोश फुंकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या उत्सवाच्या ठिकाणीसुद्धा भलतेच चैतन्य संचारले होते. या उपस्थितीवरून राजकीय कुरघोड्यांचे प्रयत्न झाले तरी आपण केवळ उत्सवावर असलेल्या प्रेमापोटीच तिथे गेलो होतो, असे स्पष्टीकरणही आव्हाड यांनी दिले आहे.

दहीहंडी उत्सव हा प्रसिद्धीच्या झोतात आला तो ठाण्यातील पाचपाखाडी परिसरात आ. जीतेंद्र आव्हाड यांनी केलेल्या धडाकेबाज आयोजनामुळे. विक्रमी बक्षिसे, स्पेनच्या कॅसलर्सची उपस्थिती, दूरचित्रवाहिन्यांचे व्यापलेले पडदे, आयोजनातील भव्यता अशा अनेक आघाड्यांवर हा उत्सव सरस ठरला होता. त्यांचेच अनुकरण अनेक आयोजकांनी केले आणि गोविंदाची पंढरी अशी ठाण्याची ओळख झाली. दहीहंडी उत्सवावर न्यायालयीन निर्बंध आल्यानंतर पाचपाखाडी येथील स्वत:चा दहीहंडी उत्सव आमदार जीतेंद्र आव्हाड यांनी बंद केला होता. मात्र, १० ते १२ वर्षे या भागातील उत्सव आणि स्वतः आव्हाड हे दहीहंडीचा केंद्रबिंदू ठरत होते. उत्सवाच्या माध्यमातून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या आव्हाड यांना उत्सवापासून दूर राहणे बोचत होते. त्यामुळेच गेल्या तीन वर्षांत कोणत्याही दहीहंडी उत्सवात सहभागी न होणारे आव्हाड सोमवारी चक्क ठाण्यातील मनसेच्या उत्सवात धडकले. तिथे जवळपास दोन तास आव्हाड यांनी पूर्वीच्याच जोशात उपस्थित गोविंदा पथकांमध्ये जोश फुंकण्याचा प्रयत्न केला. गोविंदा पथकातील एका तरुणाने आव्हाड यांना डोक्यावर बांधण्यासाठी रुमालही दिल्याने त्यांचा उत्साहसुद्धा वाढला होता. आव्हाड यांच्या प्राथमिक सहकार्यानंतरच जोगेश्वरीचे ‘जय जवान’ गोविंदा पथकाने या उत्सवात स्वत:चा दबदबा निर्माण केला. जय जवान गोविंदा पथकाने आव्हाड यांच्यासमोरच नऊ थरांची सलामी देत पुन्हा जुन्या आठवणी जागविल्या.

राजकीय टीकाटिपण्णी

आव्हाड यांचे व्यासपीठावर स्वागत करताना मनसेचे नेते अभिजीत पानसे यांनी आमदार जीतेंद्र आव्हाड हे आमचेच असल्याचे वक्तव्य केले. त्यावर ‘ये अंदर की बात है, राज ठाकरे हमारे साथ है’ असे प्रत्युत्तर आव्हाड यांनी दिले. मात्र या थट्टामस्करीचे रूपांतर नंतर राजकीय कुरघोड्यांमध्ये झाले. शिवसेनेच्या काही नेत्यांनी मनसे-राष्ट्रवादीच्या युतीबाबत आरोपही केला. मात्र, खेळीमेळीत चाललेल्या उत्सवातल्या गमती-जमतींचा राजकीय अर्थ काढला जात असेल तर तो दुर्दैवी असून त्या आरोपांना मला उत्तर द्यायचे नाही, असे सांगत आव्हाड यांनी बोलणे टाळले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत