‘जीवघेण्या’ माहुलमधून रहिवाशांची सुटका होणार

मुंबई : रायगड माझा वृत्त 

रिफायनरीच्या प्रदूषणामुळे ‘जीवघेण्या’ बनलेल्या माहुलमधून हजारो रहिवाशांची लवकरच सुटका होणार आहे. याबाबत बुधवारी महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या प्रमुख उपस्थितीत पालिका, ‘म्हाडा’, ‘एसआरए’ अधिकाऱयांसह प्रकल्पग्रस्तांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. माहुलवासीयांचे स्थलांतर राज्य सरकारच्या कुर्ला येथील संक्रमण शिबिरात लवकरात लवकर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दोन दिवसांत अंतिम बैठक होणार आहे.

पालिकेच्या विविध विकासकामांमधील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन चेंबूरजवळच्या माहुलमध्ये करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांत तब्बल साडेपाच हजारांवर प्रकल्पग्रस्त कटुंबांचे स्थलांतर माहुलमध्ये करण्यात आले आहे, मात्र या परिसरात असणाऱया केमिकल कंपन्यांच्या प्रदूषणामुळे शेकडो रहिवाशांना टीबी, कॅन्सर, दम्यासारख्या आजारांनी जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर माहुलचा परिसर रहिवाशांना राहण्यायोग्य नसल्यामुळे त्यांचे पुनर्वसन सुरक्षित ठिकाणी करावे असे आदेश उच्च न्यायालयाने दिले, मात्र पालिका किंवा राज्य सरकारकडून याची दखल अद्याप घेण्यात आली नाही. त्यामुळे गेल्या 18 दिवसांपासून माहुलवासीयांनी विद्याविहार येथे ठिय्या मांडून रस्त्यावरच संसार मांडले. दरम्यान, संतप्त रहिवाशांनी रविवारी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या घरावर धडक दिल्यानंतर प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन कुर्ला येथील एचडीआयएलच्या संक्रमण शिबिरात करण्याचे आश्वासनही मेहता यांनी दिले. ही प्रक्रिया तातडीने करावी यासाठी आज महत्त्वपूर्ण बैठक महापौरांच्या दालनात पार पडली. राज्य सरकारने ही घरे ताब्यात दिल्यानंतर तातडीने माहुलवासीयांचे स्थलांतर कुर्ला येथे करण्यात येईल असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले. यावेळी सभागृह नेत्या विशाखा राऊत, खासदार राहुल शेवाळे, आमदार मंगेश कुडाळकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, सुधार समिती अध्यक्ष दिलीप (मामा) लांडे, शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर, ‘म्हाडा’च्या झोपडपट्टी सुधार मंडळाचे विनोद घोसाळकर, रमेश कोरगावकर, अशोक माटेकर आदी उपस्थित होते.

दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांशी चर्चा
पालिकेकडे सध्या प्रकल्पग्रस्तांना देण्यासाठी माहुलव्यतिरिक्त घरे उपलब्ध नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. जर राज्य सरकारने कुर्ला येथील घरे पालिकेच्या ताब्यात दिली तर माहुलवासीयांना घरे उपलब्ध होतील, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले. या पार्श्वभूमीवर कुर्ला येथील संक्रमण शिबिरात तातडीने स्थलांतर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी येत्या दोन दिवसांत बैठक घेणार असल्याचे शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांनी सांगितले.

अठरा दिवसांत सहावा बळी
माहुलमधील प्रदूषणामुळे रहिवाशांना टीबी, कॅन्सर, दमा आणि अनेक प्रकारचे त्वचारोग होत आहेत. गेल्या पाच वर्षांत 100 जणांचा बळी गेला आहे. यामध्ये गेल्या एकाच वर्षात 50 जणांनी प्राण गमावला आहे, तर विद्याविहार येथे आंदोलन सुरू केल्यापासून विविध आजारांनी अठरा दिवसांत सहा जणांना जीव गमवावा लागला आहे.

निर्णय होईपर्यंत आंदोलन
माहुलवासीयांना आतापर्यंत अनेक वेळा आश्वासन देण्यात आले असले तरी राज्य सरकार किंवा पालिका प्रशासनाकडून त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे माहुल प्रकल्पग्रस्तांचे कुर्ला येथे स्थलांतर करण्याचे आश्वासन मिळाले असले तरी जोपर्यंत प्रत्यक्षात कार्यवाही होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलक रेखा घाडगे यांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत