जीवन प्राधिकरणच्या कार्यालयावर माथेरानकरांची धडक !

मुकुंद रांजाणे : माथेरान

नेहमीच पाण्याची अनियमित पुरवठ्याच्या बाबतीत नागरिकांच्या तक्रारी येत असल्याने या विभागाच्या अनागोंदी कारभारा मुळेच आज दि.२० रोजी विद्यमान नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी आपल्या शिष्टमंडळासहित येथील फिल्टर हाऊस येथे पाणी विभागात जाऊन अधिकारी वर्गाची कानउघाडणी करून नियमितपणे पाणी पुरवठा करण्याबाबत सूचना दिल्या.
ऐन पावसाळ्यात सुद्धा विजेच्या लपंडावामुळे अनियमितपणे पाणी पुरवठा केला जात आहे. याच एका कारणास्तव या विभागाने आपले हात झटकत आहेत. जर विजेची समस्या असेलच तर जनरेटरच्या साहाय्याने पाणी देण्याची सोय करण्यात यावी. अनेक वर्षांपासून बंद असलेले हे जनरेटर सुरू करावे अथवा नव्याने खरेदी करून नागरिकांना भेडसावत असलेली ही बाब तातडीने मार्गी लावण्यासाठी वरिष्ठांकडून प्रयत्न व्हावेत असे गटनेते प्रसाद सावंत यांनी अधिकारी वर्गाला सांगितले.
तर वीज आणि पाणी खाते यांची संयुक्तिक बैठक बोलावून काहीतरी सुवर्णमध्य काढल्याशिवाय ही महत्वपूर्ण समस्या संपुष्टात येणार नाही यासाठी लवकरच ही बैठक बोलाविण्यात यावी असे विद्यमान नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी निदर्शनास आणून दिले.
यापूर्वी अनेक अधिकारी इथे येऊन गेले त्यांच्या कार्यकाळात अशा प्रकारच्या अडचणी निर्माण झाल्या नाहीत तर केवळ आपल्या कार्यकाळात या अनुभवयास येत आहेत. जनतेला काहीही करून पाण्याची सोय करणे हे तुमचे काम आहे. त्यासाठी आपण वरिष्ठांना त्याबद्दल कळवलं पाहिजे.ऐन सुट्टयांच्या हंगामात पाण्याची गैरसोय होत असल्याने याचा इथल्या पर्यटनावर विपरीत परिणाम होत आहे अन्यथा आपण राजीनामा द्यावा असे माजी नगरसेवक प्रकाश सुतार यांनी ठणकावून सांगितले.
यावेळी गटनेते प्रसाद सावंत,नगरसेवक शकील पटेल, माजी नगरसेवक प्रकाश सुतार, जेष्ठ कार्यकर्ते राजू शहा, श्रेयस गायकवाड, सलीम मुजावर,लक्ष्मण जाबरे आदी उपस्थित होते.
माथेरान मध्ये दोनच समस्या आहेत त्या म्हणजे लाईट आणि पाणी. आम्ही वीज वितरण कंपनी अधिकारी यांना सांगितले आहे की एखाद वेळ लाईट नसेल तर चालू शकते परंतु वारंवार वीज पुरवठा अनियमित होत आहे त्यामुळे पाणी पुरवठा करण्यासाठी अडचणी निर्माण होतात. यासाठी आपण काहीतरी तोडगा काढून विजेची समस्या मार्गी लावावी जेणेकरुन आम्हाला नागरिकांना वेळेवर पाण्याची सुविधा उपलब्ध करून देता येईल.
किरण शानबाग –  महाराष्ट्र जीवन प्राधिकरण  शाखाधिकारी माथेरान
इथे एकच फिल्टर हाऊस आहे. नवीन फिल्टर ची कामे लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. अतिवृष्टीमुळे कामे करण्यात अडचणी येत आहेत. सप्टेंबर महिन्यात ही कामे पूर्ण करून देण्यात येतील. तेव्हाच आमच्याकडून पाण्याची होणारी गैरसोय संपुष्टात येईल.
सुहास मगदूम – प्रभारी उप अभियंता माथेरान
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत