जेव्हा बचावकार्यादरम्यान एनडीआरएफचा जवान पायरी होतो

तिरुअनंतपूरम : रायगड माझा ऑनलाईन 

केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर असून, युद्धपातळीवर मदतकार्य राबविले जात आहे. लोकांना सुरक्षितस्थळी पोचविण्याचे काम जोरात असून जवळपास 9 लाख लोकांनी मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. याचवेळी केरळमध्ये बचावकार्यादरम्यान, एनडीआरएफचा एक जवान स्वतः पायरी बनून लोकांना मदत करत आहे. सध्या त्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

केरळमध्ये अनेक लोक मदत करत असल्याचेही व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. परंतु, एनडीआरएफचा एक जवान स्वतः पायरी बनून लोकांना पाण्यातून सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी मदत करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा जवान राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा सदस्य आहे. या जवानाने लोकांना पाण्यातून सुरक्षित ठिकाणी पोहचण्यासाठी पाण्यात खाली वाकून आपल्या पाठीवरुन जाण्यास सांगितले आहे. त्यामुळे हा जवान सध्या सोशल मिडीयामध्ये कौतुकास पात्र ठरत आहे.

दरम्यान, केरळमध्ये बचाव पथके सातत्याने लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. मदतकार्यात अडथळे येत असल्यामुळे अनेक ठिकाणी लोकांना अन्न आणि पाणी मिळणे कठीण झाले आहे. चेंगन्नूर भागात अजूनही 10 हजार लोक अडकून पडले आहेत. एक बहुमजली इमारतीमध्ये अनेक मृतदेह असल्याची माहिती लोकांनी दिली आहे. मात्र, पाणीपातळी ओसरल्यानंतर ते बाहेर काढले जातील, असे सांगितले जात आहे.

बचाव पथके आणि हेलिकॉप्टर्स अन्न पोचविण्याची व्यवस्था करत आहेत. काही भागात मच्छिमारांनीही मदतीसाठी बोटींसह धाव घेतली आहे. पेरियार नदीच्या काठावर अनेक गायी, म्हैशी आणि शेळ्या मरून पडल्याचे भयंकर दृश्‍य दिसत आहे. पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.