जेष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामींसह तीन जणांवर गुन्हा दाखल

आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल; दिशा डायरेक्ट कंपनीचे भागीदार अन्वय नाईक यांची आत्महत्या

अलिबाग : रायगड माझा वृत्त

दिशा डायरेक्ट कंपनीचे भागीदार प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व आर्किटेक्ट अन्वय मधुकर नाईक (५४) आणि त्यांच्या आई कुमुद मधुकर नाईक (८४) यांचे मृतदेह शनिवारी त्यांच्या कावीर गावातील फार्महाउसमध्ये आढळले. विष प्राशन करून त्यांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी, आयकास्ट/एस.के. मीडियाचे फिरोज शेख, स्मार्टवर्कचे नितेश सरडा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी सकाळी मोलकरीण फार्महाउसवर आली असता ही घटना उघड झाली. दोन्ही मृतदेह दुपारी येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आले. नाईक कुटुंबीयांचे जबाब नोंदविण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. अलिबागजवळच्या कावीर या गावात नाईक कुटुंबीयांचे फार्महाउस असून काही वर्षांपासून नाईक येथे राहत होते. रिअल इस्टेट क्षेत्रातील मंदीमुळे नुकसान झाल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता आहे.

पैसे न मिळाल्याने घेतला निर्णय?
अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षया यांनी अलिबाग पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अन्वय यांनी अर्णब गोस्वामी, फिरोज शेख व नितेश सरडा यांच्या कंपन्यांसाठी काम केले होते. मात्र त्याचे पैसे न मिळाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले.

अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली आहे. त्यानुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी, आयकास्ट/एस.के. मीडियाचे फिरोज शेख, स्मार्टवर्कचे नितेश सरडा यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.